केळी व्यापाऱ्यांविरोधात शेतकरी संतप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

जळगाव - जिल्ह्यात बोर्ड दरानुसार केळीची खरेदी न करता मोजमापासाठी पट्टी काटा वापरून व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्याविरोधात जळगाव तालुक्‍यातील केळी उत्पादकांनी आज बाजार समितीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. बोर्डापेक्षा कमी दराने केळी खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आग्रह यावेळी शेतकऱ्यांनी धरला. 

जळगाव - जिल्ह्यात बोर्ड दरानुसार केळीची खरेदी न करता मोजमापासाठी पट्टी काटा वापरून व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्याविरोधात जळगाव तालुक्‍यातील केळी उत्पादकांनी आज बाजार समितीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. बोर्डापेक्षा कमी दराने केळी खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आग्रह यावेळी शेतकऱ्यांनी धरला. 

जिल्ह्यात रावेर तसेच जळगाव येथून दररोज केळीचे बोर्डभाव काढले जातात. त्यास प्रमाण मानून जिल्हाभरात केळी खरेदी व विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. मात्र या व्यवहारांवर बाजार समित्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने संबंधित सर्व व्यापारी नेहमीच केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करताना दिसून येतात. बाजार समितीचा अधिकृत परवाना नसतानाही केळी खरेदी करणाऱ्या बेकायदेशीर व्यापाऱ्यांची संख्या त्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दल तक्रार केल्यावर केळी वेळेवर कापली जात नसल्याने शेतकऱ्यांना मुकाटपणे हा अन्याय सहन करावा लागत आहे. 

व्यापाऱ्यांकडून अलीकडच्या काळात जास्तच मनमानी सुरू झाल्यानंतर भोकर (ता. जळगाव) येथील सरपंच हरीश पाटील व परिसरातील काही केळी उत्पादकांनी नुकतीच केळी पणन कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातूनच दिवाळीपूर्वी किनोद फाट्यावर केळी व्यापाऱ्यांविरोधात एल्गार पुकारण्यात आला होता. प्रसंगी केळी गाड्यांचे मोजमाप थांबविण्यासाठी भुईकाटा बंद पाडण्यात आला होता. तेव्हा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. उत्पादक, व्यापारी व बाजार समिती संचालकांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. परंतु, बैठकीला एकही व्यापारी हजर राहिला नाही. 

शेवटी दिवाळीनंतर आज पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी केळी पणन समितीच्या माध्यमातून हरीश पाटील, रंगराव पाटील (भोकर), विनोद पाटील (भादली खुर्द), समाधान पाटील (कठोरा), प्रवीण सपकाळे (फुपणी), शालीक पाटील, आदींनी उत्पादकांची बाजू मांडली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, सचिव सोपान पाटील, संचालक प्रभाकर पवार, भरत बोरसे, तर व्यापारी प्रकाश पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते. 

बैठकीत झालेले निर्णय.... 
- बोर्डभावानुसार दर्जेदार केळीला भाव द्यावा, न दिल्यास दंडात्मक कारवाई. 
- विना परवाना केळी खरेदी करणाऱ्या अनधिकृत व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई. 
- शेतकऱ्यांना केळी खरेदीनंतर बाजार समितीची पक्की पावती देण्यात यावी. 
- केळीच्या घडाचे दांड्यासहीत पूर्ण वजन करणे बंधनकारक. 
- केळी मोजणीसाठी इलेक्‍ट्रॉनिक काटा वापरावा, न वापरल्यास पाच हजार रुपये दंड. 

केळी उत्पादक व व्यापारी यांच्यात आज एकमताने ठराव मंजूर करत निर्णय झाला. मात्र व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे पालन करत व्यवहार सुरळीत करण्याकडे सध्या बाजार समितीचे लक्ष राहील. यासाठी समिती सतत प्रयत्नशील राहील. 
- प्रकाश नारखेडे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती) 

गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून केळीला अत्यंत कमी दिला जात होता त्यामुळे आज हा प्रश्‍न सहकार राज्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. त्यांच्या मध्यस्थीने घेण्यात आलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 
- हरीश पाटील (शेतकरी)

Web Title: banana farmers angry to businessman