जिल्हा बॅंकेच्या चलाखीमुळे खातेदारांना 12 कोटींचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नाशिक - नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेच्या बचत खात्यावर जमा झालेल्या 342.26 कोटींच्या जुन्या चलनातील रकमेपोटी ग्राहकांच्या खात्यावर जमा झालेले सुमारे 12 कोटी रुपये बॅंकेने परस्पर कापून घेतले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, आधीच बॅंकेने सुमारे चार महिने ग्राहकांची गैरसोय केलेली असताना आता बचत खात्यावरील व्याजाची रक्कम काढून घेतल्याने ग्राहक बॅंकेच्या शाखांमध्ये येऊन संताप व्यक्त करीत आहे. 

नाशिक - नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेच्या बचत खात्यावर जमा झालेल्या 342.26 कोटींच्या जुन्या चलनातील रकमेपोटी ग्राहकांच्या खात्यावर जमा झालेले सुमारे 12 कोटी रुपये बॅंकेने परस्पर कापून घेतले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, आधीच बॅंकेने सुमारे चार महिने ग्राहकांची गैरसोय केलेली असताना आता बचत खात्यावरील व्याजाची रक्कम काढून घेतल्याने ग्राहक बॅंकेच्या शाखांमध्ये येऊन संताप व्यक्त करीत आहे. 

मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला चलनातील हजार व पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा बॅंक व बॅंकेच्या खातेदारांमागे लागलेले शुक्‍लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. जिल्हा बॅंकेत खातेदारांनी 10 ते 14 नोव्हेंबरदरम्यान 342.26 कोटी रुपयांची जुन्या चलनातील रक्कम जमा केली होती. परंतु, रिझर्व्ह बॅंकेने नवीन नियम जाहीर करीत देशभरातील सर्व जिल्हा बॅंकांना जुने चलन स्वीकारणे व नवीन नोटा बदलून देण्यास बंदी घातली होती. रिझर्व्ह बॅंकेने पैसे स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे जिल्हा बॅंकेच्या 212 शाखांमधील व्यवहार ठप्प होऊन ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प झाले होते. नोटाबंदीचा ठरवून दिलेला कालावधी संपल्यानंतरही जिल्हा बॅंकेला पुरेसे चलन उपलब्ध केले जात नसल्याने खातेदारांची मोठी परवड झाली. त्यात फेब्रुवारीपासून बॅंकेतील व्यवहार सुरळीत झाले. परंतु, मार्चअखेर जवळ येऊनही रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकेकडे जमा झालेल्या जुन्या चलनातील नोटा स्वीकारल्या नसल्यामुळे बॅंकेच्या दृष्टीने या जमा रकमेला कुठलेही मूल्य नाही. यामुळे या जुन्या नोटांच्या मूल्यावर आधारित बचत खात्यावर व्याज जमा करणे म्हणजे बॅंकेला भुर्दंड आहे, असा व्यवहारी विचार करून बॅंकेने या काळात जमा झालेल्या रकमेवर जमा झालेल्या व्याजाची रक्कम खात्यांमधून कपात करून घेतली आहे. नोव्हेंबरच्या चार दिवसांमध्ये 342.26 कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील बहुतांश रक्कम खातेदारांनी धनादेश, एनईएफटी आदी माध्यमांतून काढूनही घेतली होती. परंतु, त्यातील खात्यावर जमा असलेल्या रकमेवर बॅंकेने जवळपास 12 कोटी रुपये व्याज जमा केले होते. ती रक्कम बॅंकेने कापून घेतल्याने ग्राहकांना मोठा भुर्दंड बसला आहे. 

तोटा वाचविण्यासाठी चलाखी? 
मार्चअखेर बॅंकेचा ताळेबंद मांडताना होणारा संभाव्य तोटा कमी करण्यासाठी बॅंकेतील शुक्राचाऱ्यांनी ग्राहकांच्या बचत खात्यावर जमा झालेली व्याजाची रक्कम कपात करून ती बॅंकेच्या जमा खात्यात वर्ग करण्याची चलाखी केल्याचे बोलले जाते. ग्राहकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यास पुन्हा 1 एप्रिलनंतर ती रक्कम बचत खात्यात वर्ग केली जाणार असल्याचे समजते. 

जुन्या चलनातील जमा रकमेचा बॅंकेला कुठलाही फायदा झाला नाही. रिझर्व्ह बॅंकेने त्या नोटा बदलून दिल्यानंतर ही कपात केलेली व्याजाची रक्कम पुन्हा बचत खात्यांवर जमा करण्यात येईल. खातेदारांनी घाबरण्याचे कारण नाही. 
यशवंत शिरसाठ, मुख्य कार्यकारी संचालक 

Web Title: bank account holder 12 crore hit