उजव्या हाताच्या बोटांवर बॅंकेत लागणार शाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

जळगाव - पाचशे, हजारांच्या नोटा बदलताना रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलविणाऱ्या नागरिकांच्या बोटाला शाई लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत; मात्र राज्यात पालिकांच्या निवडणुका होत असल्याने यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे मार्गदर्शन घेण्यात आले असून, नोटा बदलायच्या असल्यास उजव्या हाताच्या बोटाला शाई लावावी, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी बुधवारी येथे दिली. 

पालिका निवडणुकीसंदर्भात जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. 

सरकारने पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द ठरविल्यानंतर बॅंकांमध्ये या जुन्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे; मात्र या गर्दीत अनेक लोक वारंवार रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत असल्याने बॅंकांनी संशय व्यक्त केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बोटावर मतदान करताना वापरण्यात येणारी शाई लावण्याचा आदेश दिला; मात्र राज्यात 27 नोव्हेंबरला पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही आयोगाकडून डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. बॅंकेने लावलेल्या शाईमुळे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे याबाबत रिझर्व्ह बॅंकेला पत्र देऊन बॅंकेत नोटा बदलविणाऱ्या नागरिकांच्या बोटाला शाई लावू नये, अशी विनंती निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली. त्यावर बॅंकेत उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाईल, असा पर्याय रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. त्यासंबंधीचे आदेशही बॅंकांना पाठविला आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळेची ही अडचण दूर झाली आहे. मतदान करणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावली जाते, असेही सहारिया म्हणाले. 

Web Title: The bank will have the right hand fingers with ink