नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आता प्रगत शेती करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा मानस
नाशिक - शेतीसाठीचे नवीन तंत्रज्ञान, खते, औषधांचा वापर, सेंद्रीय शेतीसह सर्वांगीण माहिती घेत आज राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातल्या सर्वच स्टॉलला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा मानस
नाशिक - शेतीसाठीचे नवीन तंत्रज्ञान, खते, औषधांचा वापर, सेंद्रीय शेतीसह सर्वांगीण माहिती घेत आज राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातल्या सर्वच स्टॉलला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

"सकाळ-ऍग्रोवन'च्या दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेनिमित्त शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. परिषदेला आलेला प्रत्येक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेत होता. प्रदर्शनातील बसवंत बेदाणा, कृषी विभाग व कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या विविध योजनांसह विद्राव्य खते, औषधांचा वापर कसा करायचा याची माहिती शेतकरी घेत होते. कमी खर्चात जास्तीत उत्पादन कसे घेता येईल, शेडनेट व पॉलिहाउसमध्ये फलोत्पादन कसे घेता येईल, याची माहिती घेतली. आता नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करणार असल्याचे अकलूज (जि. सोलापूर) येथून आलेले अजित माने यांनी सांगितले. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोपांची माहिती, लागवड याची शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

'आम्ही द्राक्षांचे उत्पादन घेतो; पण परिषदेत सहभागी झाल्याने आम्हाला सीताफळाच्या नवीन जातीची येथे माहिती मिळाली,'' असे देवरगाव (ता. चांदवड) येथील प्रवीण पवार व तुषार कुरणे यांनी सांगितले. सततच्या दुष्काळामुळे शेती अडचणीत येत आहे, त्यामुळे आता कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी ठिबक, तुषार महत्त्वाचे आहे. त्याबाबत महत्त्वाची माहिती प्रदर्शनात मिळाल्याचे नांदगाव येथील प्रल्हाद पवार यांनी सांगितले. नव्या तंत्रज्ञानाची प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे. प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांची महत्त्वपूर्ण औषधांची माहिती मिळाली. परसदारी व बंदिस्त कुक्कुटपालनाची माहिती घेतल्याचे शहापूर (जि. ठाणे) येथील महेंद्र पाटील व दिनेश पाटील यांनी सांगितले. प्रदर्शनाला भेट देणारा प्रत्येक शेतकरी आत्मविश्‍वासाने शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पादन घेण्याचा मनोदय व्यक्त करीत होता.

Web Title: Based on the new technology will now advanced farming