हवाई वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात करिअरची उत्तम संधी - डॉ. दिलीप धोंडगे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

सटाणा - जागतिकीकरणामुळे हवाई, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भारताने वेगाने प्रगती केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचतारांकित हॉटेल्स, हवाई वाहतूक व पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेत ग्रामीण भागातील युवक – युवतींनी आपले करियर घडवावे आणि स्वत:ला सिद्ध करावे, असे आवाहन शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आज सोमवार (ता.१) रोजी येथे केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आय.आय.बी.एम.कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिंचवड (पुणे) व जेट इंडिया एवीएशन इंस्टिट्यूट यांच्यातर्फे सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत करियर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. धोंडगे बोलत होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस. बी. मराठे, लोकनेते पं.ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. एस. देवरे, युवाशक्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष नंदकिशोर शेवाळे, तज्ञ मार्गदर्शक पूनम जगताप आदि उपस्थित होते. 

डॉ.धोंडगे म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांची ऊर्जा ही देशातील सर्वच क्षेत्राला उन्नत करणारी असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या काळात हवाई, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करियर केल्यास तरुणांना देश व परदेशात मोठ्या पगाराच्या रोजगाराची संधी मिळणार आहे असेही डॉ. धोंडगे यांनी स्पष्ट केले.  

यावेळी बोलताना संस्थेच्या मार्गदर्शक पूनम जगताप यांनी जेट इंडिया संस्थेचे सर्व कोर्सेस शासन मान्यताप्राप्त असून जगामध्ये या क्षेत्रातील वाढत्या मागणीनुसार कुशल कामगार पुरविण्याचे काम गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत संस्थेने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असून उत्कृष्ट संभाषणकला, उच्चप्रतीचे राहणीमान, आंतरराष्ट्रीय भाषांचे ज्ञान, व्यक्तिमत्व विकास, संगणक, भाषेवर प्रभुत्व यांसारख्या विविध घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी या क्षेत्राचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहनही सौ. जगताप यांनी केले. जेट इंडिया संस्थेचे नीलकंठ भिडे, रिंकू पाटील, विक्रम राठोड, सूरज परदेशी, स्मिता चंद्रात्रे, गीतांजली खैरनार, गायत्री मोरे, नीतिशा कुलकर्णी, विजय पवार, रोहित पगारे, दिव्या अमृतकार, वासंती देशमुख, धनश्री शिंदे आदींसह तालुक्यातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Better opportunities for career in air transport and tourism sector Dr Dilip Dhondge