
धुळेः "एनआरसी', "सीएए' आणि "एनपीआर' कायद्याला विरोधासाठी बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या "भारत बंद'ला येथील चाळीसगाव रोड परिसरात बुधवारी (ता. 29) गालबोट लागले. किरकोळ अपघातानंतर त्याचे पडसाद दोन भिन्न समुदायांच्या परस्परांवरील दगडफेक, जाळपोळीच्या घटनांतून उमटले. त्यावेळी काचेच्या बाटलीत भरलेल्या दगडांचा त्या बाटल्यांसह मारा, तलवारी, विविध शस्त्रांचा सर्रास वापर झाला. त्यावरून ही घटना पूर्वनियोजित होती की काय आणि त्यासाठी "गोली मास्टर' म्हणजेच नशेखोर तरुणांचा वापर केला गेला का, याविषयी विविध पातळींवर संशय व्यक्त होत आहे. विविध संदर्भ घेत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
चाळीसगाव चौफुली, शंभर फुटी रोडवर दोन भिन्न समुदायांचे जमाव एकमेकांना भिडले. त्यातही सरासरी 16 ते 30 वयोगटांपर्यंतच्या तरुणांचाच अधिक सहभाग होता. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याजवळ रिक्षा व मोटारसायकलचा अपघात झाला. रिक्षात दोन महिला होत्या. त्यांना दगड लागल्याने दुसऱ्या भिन्न गटाकडून दगडफेक होत असल्याचा संशय आला व त्या महिला आरडाओरड करत पळत सुटल्या. अशा गैरसमजुतीतून दोन भिन्न गट समोरासमोर आले आणि स्थितीला हिंसक वळण लागले, अशी प्राथमिक माहिती पुढे आली. त्यात दोन्ही गटांमध्ये तरुणांचाच अधिक सहभाग होता.
"मास्टर माइंड' तर नाही?
असे असले तरी "भारत बंद'ला, शांततेला गालबोट लावण्याचे काही विघ्नसंतोषी, समाजकंटकांचे मनसुबे असावेत. त्यात त्यांनी पूर्वनियोजन करून ठेवले असावे. दोन समुदायांत दुही राहण्यासाठी शंभर फुटी रोड, चाळीसगाव रोड, तिरंगा चौकासह अन्य काही परिसरातील "गोली मास्टर', "नशेडी' अर्थात नशेखोर तरुणांचा, तसेच बेरोजगार, हिंसक प्रवृत्तीच्या तरुणांचा वापर करण्याचे नियोजनही केले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष घटनेनंतर काढला जाऊ शकतो. कारण असंख्य बाटल्यांमध्ये रात्रीतून दगडे भरणे शक्य नाही. ते काम काही दिवसांपासून सुरू असावे. नंतर "भारत बंद'च्या दिवशी काही निमित्त हेरून अशांतता निर्माण करण्याचे मनसुबे विघ्नसंतोषी, समाजकंटकांनी केले असावेत. किरकोळ अपघाताचे निमित्त मिळताच घटनेला हिंसक वळण दिले गेले असावे, असाही कयास विविध पातळीवरून बांधला जातो. यामागे कुणी "मास्टर माइंड' तर नसावा ना, असा संशयही व्यक्त होताना दिसतो.
पोलिसांचा तपासात कस
पोलिसांच्या तपासातून घटनेमागचे नेमके वास्तव समोर येईलच. मात्र, प्रत्यक्षदर्शी किंवा विविध चर्चांमधून घटना पूर्वनियोजित होती किंवा कसे याविषयी निरनिराळ्या पातळीवरून अंदाज घेतला जात आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समाजासमोर येण्यासाठी पोलिसांचा तपासात कस लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.