सहकारी पाणीवापर संस्थेचे प्रणेते भरत कावळे यांचे निधन 

सहकारी पाणीवापर संस्थेचे प्रणेते भरत कावळे यांचे निधन 

पिंपळगाव बसवंत - सहकारी पाणीवापर संस्थांची चळवळ राज्यभर पोचवून वाघाड धरणातील सिंचन व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावलेले, पुरोगामी चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते व ओझर येथील समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत त्र्यंबक कावळे (वय 67) यांचे आज पहाटे ओझर येथे राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ओझर येथील राम मनोहर लोहियानगरमधील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी लता, मुलगे सागर, सचिन, मुलगी पल्लवी असा परिवार आहे. 

स्वत:कडे एक गुंठाही जमीन नसताना त्यांनी पाण्याचे समन्यायी वाटप व शेतीच्या क्षेत्रात मोठे काम उभे केले. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून सिंचनाच्या पाण्यावरील हक्क प्रस्थापित व्हावा, यासाठी त्यांनी समाज परिवर्तन केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पाणीवापर संस्थांची चळवळ सुरू केली. त्यातूनच वाघाड धरणावर पहिली सहकारी पाणीवापर संस्था स्थापन केली. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचे सर्वांमध्ये समान व न्याय्य वाटप झाले पाहिजे, या भूमिकेतून आयुष्यभर त्यांनी सहकारी पाणीवापर संस्थांची चळवळ शेतकऱ्यांपर्यंत पोचविली. वाघाड धरणाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केलेल्या कामामुळे ही चळवळ देशभर पसरली. 

कावळे यांच्या सहकारी पाणीवापर संस्थेच्या अभिनव प्रयोगाची दखल जागतिक बॅंकेने घेत वाघाड प्रकल्पाला अर्थसहाय्य केले. सिंचन व्यवस्थापनात लाभधारकांचा प्रत्यक्ष सहभाग ही संकल्पना समाज परिवर्तन केंद्राचे अध्यक्ष उपाध्ये यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. पाण्याच्या समन्यायी वाटपपद्धतीमुळे सिंचन क्षेत्र वाढले आणि त्यायोगे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यातही मोठा हातभार लागला. ओझर येथील सहकारी पाणीवापर संस्थेचा हा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर त्याचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रातील अनेक गावांत झाला. यासाठी कावळे यांनी अथक परिश्रम घेतले. 

ओझर येथील "एचएएल' कारखान्यात नोकरी करीत असताना कावळे यांनी "एचएएल'च्या कंत्राटी कामगारांची संघटनाही बांधली. "एचएएल'साठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांसाठीही त्यांनी लढा उभारला. विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना "एचएएल'मध्ये नोकरी मिळावी, यासाठी दीर्घकाळ लढा दिला. "एचएएल'मध्ये नोकरी करीत असताना, नोकरीत राहून लढा देता येत नाही म्हणून नोकरीचा राजीनामा देत त्यांनी कामगार लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळेच आज "एचएएल'मध्ये स्थानिक तसेच विस्थापित झालेल्यांना नोकरी मिळाली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या ना. ग. गोरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकारी पाणीवापर क्षेत्राची व त्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. 

ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, साथी एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, बापूसाहेब उपाध्ये यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन कावळे यांनी सार्वजनिक जीवनाला सुरवात केली. त्यांनी आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगवासही भोगला होता. त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ओझर येथील आदिवासी बांधवांना आपल्या हक्काचे घर मिळावे, यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा देत त्यांच्यासाठी राम मनोहर लोहियानगरची स्थापना करून घरकुले मिळवून दिली. 

भरत कावळे यांच्या निधनाने शेतकरी व गोगरिबांचा आधारवड निखळला आहे. त्यांनी आदिवासी बांधवांना घरे मिळवून दिलेल्या ओझरच्या लोहियानगरमध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नाशिक विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, ऍड. शांताराम बनकर, माणिकराव बोरस्ते, भास्करराव शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक शिरसाट आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com