भीष्मराज बाम यांना अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

नाशिक - क्रीडामानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ क्रीडा संघटक, मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्यावर शनिवारी पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करण्यात आले. साश्रुनयनांनी भीष्मराज बाम यांना निरोप देतांना उपस्थित क्रीडाप्रेमी, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हुंदका फुटला. तत्पूर्वी अंत्यदर्शनासाठी भीष्मराज बाम यांचे पार्थिव महात्मानगर मैदानाजवळील वाचनालयात ठेवण्यात आले होते.

महापौर रंजना भानसी, स्वाध्याय परिवाराच्या धनश्री तळवलकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रांतील पदाधिकारी व अन्य मान्यवरांनी बाम यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. सकाळी साडे अकराला बाम यांच्या पार्थिवावर पंचवटीतील अमरधाम येथे त्यांचे चिरंजीव सनदी लेखापाल अभिजित बाम यांनी अंत्यसंस्कार केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhishmaraj bam last rites