नोटा बदलण्यासाठी बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

प्रतिग्राहक चार हजार रुपयांचे वितरण; दोन हजारांची नोट चलनात दाखल

जळगाव - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी अनेकांनी आज सकाळपासूनच सर्वच बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नोटा बदलून घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी अधिकच्या खिडक्‍या सुरू करण्यात आल्या होत्या.

प्रतिग्राहक चार हजार रुपयांचे वितरण; दोन हजारांची नोट चलनात दाखल

जळगाव - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी अनेकांनी आज सकाळपासूनच सर्वच बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नोटा बदलून घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी अधिकच्या खिडक्‍या सुरू करण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मंगळवारी (८ नोव्हेंबर) घेतला. त्यानंतर कालच्या (९ नोव्हेंबर) सुटीनंतर आजपासून बॅंकांचे कामकाज सुरू करण्यात आले. नोटा बदलून देण्यासाठी बॅंका पूर्वतयारी करून सज्ज होत्या. मोंदीच्या निर्णयानंतरचा आज पहिलाच दिवस असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने एका व्यक्‍तीस साधारण एक ते दीड तास रांगेत उभे राहून नोटा बदलून घ्याव्या लागल्या. बॅंकांमध्ये हे काम सुरू असताना कोणतेही गोंधळाचे वातावरण पाहावयास मिळाले नाही.

दोन हजारांची नोट चलनात
भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. त्यातील दोन हजार रुपयांची नोट चलनात आली असून, भारतीय स्टेट बॅंकेसह अन्य बॅंकांमध्येही नोटा बदलून देताना नवीन चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटसोबत पन्नास व शंभराच्या नोटा दिल्या जात आहेत. एका व्यक्‍तीस चार हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या, तर दहा हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट करून घेतले जात होते. 

नव्या नोटांचे आकर्षण
चलनात आलेली दोन हजार रुपयांची नोट ग्राहकांना बॅंकांमध्ये उपलब्ध झाली होती. पाचशे आणि हजार रुपयांची नोट चलनातून बंद झाल्यानंतर बॅंकेचा आज पहिलाच दिवस होता. त्यामुळे नागरिकांजवळ असलेल्या शंभरच्या नोटा जवळपास संपलेल्या होत्या. यामुळे बॅंकांमधून चार हजार रुपये बदलून मिळत असल्याने अनेकांनी सकाळपासूनच रांगा लावलेल्या होत्या. बॅंकेत नोटा बदलून घेतल्यानंतर नागरिकांच्या हातात नवीन दोन हजार रुपयांची नोट पडत असल्याने त्यांच्यात आकर्षण आणि वेगळा आनंद दिसत होता.

बॅंकांनी रात्री केले नियोजन
सुटीनंतर चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी नऊपासूनच बॅंकेचे कामकाज सुरू करण्यात येणार होते. त्या अनुषंगाने नागरिकांची होणारी गर्दी आणि ऐनवेळी गोंधळ निर्माण होऊ नये, या हेतूने बॅंकांतर्फे काल (९ नोव्हेंबर) रात्री सर्व नियोजन करण्यात आले होते. यात बॅंकेत किती खिडक्‍या (काऊंटर) लावायच्या, तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती या व्यतिरिक्‍त पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटा वेगवेगळ्या करण्याचे काम करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी नऊलाच नोटा बदलून देण्याच्या कामाला सुरवात झाली होती.

अतिरिक्‍त कक्षाची व्यवस्था
भारतीय स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेसह स्वातंत्र्य चौक, शिवकॉलनी शाखा, आयडीबीआय, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्यासाठी जास्तीचे टेबल लावण्यात आले होते. त्यानुसार स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेत नियमित तीन कक्ष (काऊंटर) सुरू असतात. परंतु आज तेरा कक्ष सुरू करण्यात आले होते. यात तीन कक्ष नोटा बदलून देण्यासाठी, तर दहा कक्ष खात्यात रक्‍कम जमा करणाऱ्यांसाठी सुरू होते. तर बॅंक आवारात नागरिकांना संपूर्ण माहिती देण्यासह अर्ज भरून देण्यासाठी तीन कक्ष थाटण्यात आलेले होते. स्वातंत्र्य चौकातील शाखेतही दोन कक्ष नोटा बदलून देण्यासाठी आणि एक कक्ष रक्‍कम खात्यात जमा करण्यासाठी होते.

अन्य बॅंकांना एक लाखाची कॅश
नागरिकांना नोटा बदलून देण्यासाठी स्टेट बॅंकेतर्फे अन्य बॅंकांना रकमेचा (कॅश) पुरवठा करण्यात आला. पोस्टासह संबंधित सर्व बॅंकांना स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेकडून नवीन दोन हजार रुपयांच्या नोटेसह एक लाख रुपये रक्कम देण्यात आल्याचे बॅंक अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त
बॅंकांमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार टाळण्यासाठी बॅंकांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॅंकांच्या बाहेरील परिसरात आणि आतमध्येही तीन-चार पोलिस पाहावयास मिळाले. 

पोस्टात केवळ डिपॉझिट
केंद्र शासनाकडून बॅंक तसेच पोस्टातून नोटा बदलून घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्यानुसार जळगावातील टपाल कार्यालयातही जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु, टपाल कार्यालयात नोटा बदलून देण्यासाठी पाहिजे तितकी रक्‍कम उपलब्ध नसल्याने केवळ डिपॉझिट करण्याचीच सुविधा उपलब्ध होती. यामुळे नोटा बदलण्यासाठी येणाऱ्यांना तेथून परत जावे लागत होते. हीच परिस्थिती शहरातील काही खासगी बॅंकांमध्येही होती.

जिल्हा बॅंकेला नोटा न स्वीकारण्याचे आदेश
पाचशे व हजाराच्या नोटांवरून बॅंकांमध्ये गोंधळ उडालेला असताना सहकार सचिवांनी मात्र जिल्हा बॅंकेला चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांसह अनेकांची पंचाईत होणार आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने जिल्हा बॅंकेच्याच शाखा असल्याने त्या ठिकाणच्या व्यवहारांवरही या आदेशाचा परिणाम होईल, असे मानले जात आहे.

गॅस वितरकांकडून सुटे पैसे देण्याचे आवाहन
आय.ओ.सी., बी.पी.सी. आणि एच.पी.सी. या गॅस कंपन्यांकडून वितरकांना ११ नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, सिलिंडर पोहोचविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास ग्राहकांकडून पाचशे व हजार रुपयांच्या नोटाच दिल्या जात आहेत. मुळात गॅस सिलिंडरचे दर ५५६ रुपये असताना ग्राहकांकडून दोन पाचशेच्या किंवा हजाराची नोट दिली जात आहे. सर्व ग्राहकांकडून सुटे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सुट्या पैशांअभावी ग्राहकांना उर्वरित रक्‍कम देण्याची समस्या निर्माण होत असून, ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांनीही सुटे पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १२ नोव्हेंबरपासून पाचशे व हजाराची नोट न घेता नवीन चलनात आलेल्याच नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचे खानदेश एलपीजी वितरक संघटनेचे अध्यक्ष दिलीप चौबे यांनी कळविले आहे.

Web Title: big line to bank for currency changes