Dhule News : मध्य प्रदेशातील दुचाकीचोर गजाआड; LCBची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime branch

Dhule News : मध्य प्रदेशातील दुचाकीचोर गजाआड; LCBची कामगिरी

धुळे : मध्य प्रदेशातील दुचाकी चोरी करणाऱ्या‍ टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने गजाआड केले. टोळीकडून अडीच लाखांच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या.

आरोपींना मुद्देमालासह जुलवानिया (मध्य प्रदेश) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली. (Bike theft gang in Madhya Pradesh busted by local Crime Branch team dhule news)

जुलवानिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरी झालेल्या दोन दुचाकी (एमपी ४६, एमक्यू २४१८ व एमपी १०, एमजे ८६४४) दोन व्यक्ती धुळ्याकडे आणत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना बुधवारी मिळाली.

त्यांनी तत्काळ पथकाला चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले. पथकाने चाळीसगाव रोड चौफुली येथे सापळा रचत संशयित दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. जिब्राईल हुसैन अहीर (वय २०) व तालिब महेबूब पटेल (२३, रा. संजयनगर, खरगोन) अशी त्यांची नावे आहेत.

चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पथकाने ताब्यात घेत एलीसीबी कार्यालयात चौकशीसाठी आणले. त्यांनी मोटारसायकली जुलवानिया येथून चोरी करून धुळे येथे नातेवाइकांकडे ठेवण्यासाठी येत असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

चौकशीत मध्य प्रदेश, तसेच जळगाव जिल्ह्यातून चोरी केलेल्या तीन दुचाकी धुळे येथील नातेवाइकांकडे ठेवल्याचेही संशयितांनी सांगितले. यात एमपी १० एमजे ८६४४, एमपी १० एमएन ३९४३, एमएच १९ बीआर ३२८६ व एमएच १९ सीएस ७८६२ या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

त्यांची किंमत दोन लाख ४० हजार आहे. जप्त दुचाकींपैकी एमपी ४६ एमक्यू २४१८ क्रमांकाची दुचाकी चोरी झाल्याबाबत जुलवानिया ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने संशयित दोघांना मुद्देमालासह पुढील तपासासाठी तेथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, संजय पाटील, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, पंकज खैरमोडे, राहुल सानप, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर यांनी केली.