बेफाम तरुणाई अन् बेलगाम वाहने

बेफाम तरुणाई अन् बेलगाम वाहने

जळगाव शहरातून जाणारा महामार्ग, त्यावरील प्रचंड वाढलेली वाहतूक, समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या.. या सर्व घटकांनी महामार्गाला ‘मृत्यूचा सापळा’ हे बिरुद कधीच चिकटवून टाकलेय.. डंपर, ट्रॅक्‍टर आणि अवजड वाहनांच्या वर्दळीने महामार्ग धोकादायक झाला आहेच; पण गेल्या काही वर्षांत शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही तरुणाईच्या हाती लागलेल्या सुसाट अन्‌ बेलगाम दुचाकींनी मॉर्निंग वॉकला अथवा रात्री शतपावली करायला निघालेल्या पादचाऱ्यांचाही बळी घेतल्याचे प्रकार घडल्याने पायी चालणेही सुरक्षित राहिलेले नाही. पहाटे, रात्री रस्ते ओस असताना काय अन्‌ महाविद्यालयीन रस्त्यांवर काय, या अनियंत्रित दुचाकींवर ना तरुणाईच्या पालकांचे नियंत्रण राहिले ना पोलिस यंत्रणेचा वचक. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या बळीनंतर हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आलाय... 

रात्री जेवणानंतर शतपावली करायला निघालेल्या दाम्पत्याच्या जिवावर बेतणारी घटना गेल्या आठवड्यात घडली. सुसाट दुचाकीस्वाराने सविता बिर्ला या महिलेस धडक दिल्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या. चार-पाच तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सविता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या जेवणानंतर रात्री पतीसह फिरायला निघालेल्या असताना ओस रस्ता आणि सुसाट दुचाकी काळ बनून आली.. क्षणात होत्याचे नव्हते झाले. का, कसे घडले? आपल्यासोबतच ही घटना का? ज्यांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली, ते त्यांचे पती या अनुत्तरित प्रश्‍नांनी सुन्न आहेत. एरवी ट्रक, ट्रॅक्‍टर, डंपरच्या धडकेने जाणाऱ्या बळींवर चर्चा होते. मात्र अनियंत्रित व बेलगाम दुचाकीस्वारांमुळे देखील अनेकांना प्राण गमवावे लागत असून, त्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे शहरात वाढत चाललेल्या या गंभीर समस्येचा घेतलेला हा सार्वत्रिक आढावा... 

जळगाव : अपघातांचे केंद्र 
जळगाव जिल्हा हा अपघातांचे केंद्र म्हणून अलीकडे ओळखला जाऊ लागला आहे. मुंबई- नागपूर महामार्ग क्रमांक सहा, औरंगाबाद- जळगाव, चाळीसगाव- औरंगाबाद, पहूर- बऱ्हाणपूर, बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर असे लांब टप्प्याचे रस्ते जळगाव जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग, राज्यमार्ग म्हणून आहेत. विशेष म्हणजे हे सर्व मार्ग कमी- अधिक प्रमाणात होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचे सापळे बनले आहेत. मुंबई- नागपूर महामार्ग क्रमांक सहा तर वर्षाला जवळपास साडेतीनशेवर बळी घेणारा आणि आठशेवर वाहनचालकांना जखमी करणारा ‘यमदूत’ बनला आहे. वाढती वाहने, वाहतुकीची कोंडी आणि अपघात यामुळेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, एकूणच प्रशासकीय अनास्था, उदासीनता आणि मक्तेदार कंपन्यांच्या आर्थिक स्थितीमुळे चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांची संख्या जराही कमी व्हायला तयार नाही. 

महामार्ग जळगावसाठी धोकादायक 
हा महामार्ग सर्वाधिक धोकादायक ठरलाय तो जळगाव शहरासाठी. कारण, महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेल्या साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या जळगाव शहरातील सुमारे लाखांवर वाहनचालक या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, बस, व्हॅन आदी वाहनांमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतात. महामार्गावरील अपघात साधारणत: ट्रक, ट्रॅक्‍टर, कंटेनर, कार यांच्यामुळे घडतात, असे मानले जाते. त्यात प्रामुख्याने दुचाकीस्वार मोठ्या संख्येने बळी पडतात. चौपदरीकरणात बायपास मार्ग जात असल्याने जळगाव शहरातील या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असे मानले जाते. परंतु, प्रत्यक्षात या मार्गाच्या चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍नही मोठी समस्या आहे. ही दोन्ही कामे झाल्याशिवाय या रस्त्यावरील अपघात नियंत्रणात येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

दुचाकीही उठल्या जिवावर 
एकीकडे महामार्गामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त असताना जळगाव शहरातील मस्तवाल तरुणाई आपल्या ताब्यातील दुचाकी ‘जेट विमान’ हाती आल्याच्या आविर्भावात दामटत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या पाच- सहा वर्षांत दुचाकीच्या धडकेने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण शहरात कमालीचे वाढले आहे. महाविद्यालये, खासगी क्‍लासेसच्या परिसरात वाहतूक नियम धाब्यावर बसवत सुसाट धावणाऱ्या दुचाकी कोणावरही कधी ‘काळ’ बनून धडकतील, याचा नेमच नाही अशी स्थिती आहे.  

बेलगाम तरुणाई, अनियंत्रित वेग 
सर्वसाधारणपणे महाविद्यालयीन तरुणांना या रेसर बाईक्‌सने वेड लावलंय. दहावी-बारावीतच मुलांच्या हाती बाईक पडल्यानंतर या अनियंत्रित वाहनांवर तरुणाई स्वार होऊन ती स्वत:ही बेलगाम झाली आहे. शैक्षणिक हब असलेल्या मू. जे. महाविद्यालय परिसरात एक-दीड किलोमीटरच्या परिघात चार- पाच महाविद्यालये एकवटली आहेत. शिवाय, शहरातील मध्यवर्ती ठिकाणीही महाविद्यालये व खासगी क्‍लासेसच्या परिसरात सुसाट धावणाऱ्या दुचाकींचे चित्र आता नित्याचेच आणि दिवसभराचे झाले आहे. त्यातून लहान- मोठे अपघात घडत असतात. मात्र, रात्री दहा- बारा वाजेपर्यंत मित्र- मैत्रिणींसोबत सुसाट बाईक चालविणाऱ्या तरुणाईवर ना पालकांचे नियंत्रण आहे, ना त्यांच्या वाहनांवर पोलिसांचे. विशेष म्हणजे, मुलीही यात जराही मागे नाहीत. स्वत:चा जीव धोक्‍यात घालण्यासह रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांचीही सुरक्षा यामुळे कमालीची धोक्‍यात आली आहे.
 
वारंवार घडणाऱ्या घटना 
दुचाकीमुळे होणारे अपघात, त्यातील बळी आणि जखमी होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. गेल्यावर्षीही एक वृद्धास क्रीडा संकुलासमोरील याच मार्गावरून पहाटेच्या सुमारास दुचाकीने उडविले होते, त्यात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. तर नूतन मराठा महाविद्यालयासमोर दुचाकीने रात्री बाराच्या सुमारास तरुणास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला व त्यास कायमचे अपंगत्व आले आहे. गेल्या तीन- चार वर्षांत सातत्याने या घटना घडत आहेत. 

हे आहेत ‘ब्लॅक स्पॉट’ 
शहरात रात्री आणि पहाटे पायी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही ठराविक भागातील रहिवासी आवर्जून या दोन्ही वेळेस शतपावली करण्यास निघतात. आणि नेमके हेच रस्ते दुचाकीस्वारांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’ ठरले आहेत. यात छत्रपती क्रीडा संकुलासमोरील रस्ता, रिंगरोड ते थेट सिंधी कॉलनीपर्यंत, महाबळ ते आकाशवाणी चौक, डी-मार्ट ते गिरणा टाकीपर्यंतचा रस्ता, ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी, आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्यचौक व पुढे पांडे डेअरी चौकापर्यंतचा मार्ग, स्टेट बॅंक मुख्य शाखा ते आर.आर. विद्यालय, डी- मार्ट ते मोहाडी रस्ता, पंचमुखी हनुमान ते सिंधी कॉलनी मार्ग या रस्त्यांचा समावेश आहे. या प्रत्येक रस्त्यावर गेल्या काही वर्षांत सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. यापैकी आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली व पुढे महाबळपर्यंत तसेच डी- मार्ट ते गिरणा टाकीपर्यंतच्या रस्त्यावरून वायुवेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पायी चालणाऱ्यांसह नियमाने वाहने चालविणाऱ्या अन्य चालकांनाही या अनियंत्रित वाहनांचा त्रास होऊ लागला आहे. 

अशा आहेत धोकादायक वेळा 
साधारणपणे सायंकाळी आठपासून रात्री नऊनंतर रस्त्यांवरील वाहतूक बऱ्यापैकी कमी होऊन जाते. त्यानंतर तरुणाईच्या हाती असलेल्या ‘रेसर बाईक’चा वेग वाढतो. अकरा- साडेअकरापर्यंत मोटारसायकलींची शर्यत लागल्यासारख्या या बाईकस्‌ प्रमुख रस्त्यांवरून घिरट्या घालत असतात. त्यावरील दुचाकीस्वारांची संख्या दोनपेक्षा अधिकच असते. तसेच पहाटे साडेपाचपासून क्‍लासला निघालेले तरुण सुसाट वेगात दुचाकी उडवत असतात. 

सुस्त पोलिस यंत्रणा 
दुचाकीवर तीन आणि कुठे तर चार जणांचा भार, अनियंत्रित वेग, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल आपल्या दुचाकीसाठी नाहीच या आविर्भावात प्रत्येक सिग्नल तोडणे... हे प्रकार नित्याचेच झाले आहे. विविध ठिकाणी ड्यूटीस असलेल्या वाहतूक पोलिसांनी शिटी मारलीच तर हे भुर्रकन्‌ जाणारे तरुण त्यांच्या हाती कधीच लागत नाहीत. प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून वाहने चालविणाऱ्यांना मात्र वाहतूक यंत्रणा आवर्जून थांबवते, हा फरक म्हणजे विविध चौकातील नेहमीचे चित्र बनलेय. शिटी मारण्यापलीकडे वाहतूक पोलिसांची मजल जात नाही आणि या बेलगाम वाहनांवर कारवाई करण्यापर्यंत ते धजावत नाही. 

किमान उपायही दुरापास्त 
साधारण वर्ष, दोन वर्षांपूर्वी क्रीडा संकुल, नवे स्थानकासमोरील मार्ग, काव्यरत्नावली चौक, रिंगरोड आदी प्रमुख व रुंद रस्त्यांवर पोलिसांकडून ‘झिक झॅक’ पद्धतीचे बॅरिकेटस्‌ लावण्यात येत होते. या बॅरिकेटस्‌मुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांचाही वेग नियंत्रित राहायचा. अर्थात, दोन- चार ठिकाणीच ही उपाययोजना करण्यात आली होती. ती तोकडी होती, तरीही अशाप्रकारची उपाययोजना शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर केल्यास आणि सोबतच त्याठिकाणी नाकाबंदीसाठी पोलिस नियुक्त केल्यास या बेलगाम वाहनांवर काही प्रमाणात का होईना, नियंत्रण येऊ शकेल. 

पोलिसांचा संपला धाक 
गेल्या तीन-चार वर्षांत तर कायदा-सुव्यवस्थेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडालेला दिसतो. वाळूमाफियांची मुजोरी ही या जिल्ह्याला नवीन नाही. वाळूचे वाहन, डंपर थेट अडविण्याचा राग आल्याने चालकाने डंपर थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर नेण्यापर्यंत मजल गेली. कारवाईला गेलेल्या महसूल यंत्रणेच्या तर हे वाळूमाफिया अगदी जिवावर उठलेत. तर सामान्य वाहनचालकही कमालीचे मुजोर झालेत. कुणी सिग्नल तोडला, कुणी तीन सीट दुचाकीवर असेल आणि त्याला थांबवले तर हे मुजोर वाहनचालक थेट पोलिसाशी वाद घालायला मागेपुढे पाहत नाहीत. चौकांमध्ये नियुक्त पोलिस नियम धाब्यावर बसवत वाहने दामटणाऱ्यांसमोर हतबल होऊन बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करताना दिसत नाहीत. पोलिसांचा धाकच संपला, असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. 

घरातच केलेली हेल्मेटसक्ती 
नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरवातीला पोलिस प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. मात्र, ही शिस्त केवळ पोलिस अधीक्षक कार्यालयापुरती मर्यादित होती का? असा प्रश्‍न पडतो. ज्याठिकाणी वर्दळ नाही, वाहतूक नाही अशा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात त्यांनी ‘हेल्मेट सक्ती’चा फतवा काढला. त्यांच्या कार्यालयासमोर बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांसमोर नियम धाब्यावर बसविणारे दुचाकी, चारचाकींसह ऑटोरिक्षा चालक अधीक्षकांना दिसत नाहीत का? हादेखील प्रश्‍नच आहे.

या असू शकतात उपाययोजना 
 रात्री ९ ते ११ वाहतूक पोलिसांची नियुक्ती 
 प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी 
 मोकळ्या रस्त्यांवर बॅरिकेटस्‌ लावणे 
 महाविद्यालयीन परिसरात पोलिसांची ड्यूटी 
 दंडात्मक नव्हे; वाहन जप्तीची कारवाई  
 संबंधित तरुणांच्या पालकांवरही कारवाई 
 प्रत्येक चौकात मध्यभागी हवेत पोलिस 

सकाळी फिरायला जाताना नेहमी सुसाट वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. ही वाहने केव्हा जोरात जवळून जातात हे समजतही नाही. त्यामुळे नेहमीच जीव मुठीत घेऊन, मनात भीती बाळगूनच पायी चालावे लागते. अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईसह त्यांची वाहने जप्त केली पाहिजे.  
- आशा वाणी 

गिरणा टाकी ते आकाशवाणी चौकापर्यंत नेहमी सकाळी  व सायंकाळी मी फिरायला 
जातो. परंतु या सुसाट वाहनांच्या धाकाने जीव मुठीत घेऊन फिरायला जावे लागते. यासाठी पोलिस प्रशासनाने अशा बेशिस्त व सुसाट वाहनांवर कारवाई  करायला हवी. 
- प्रकाश सोनवणे  

दररोज सकाळी पहाटे  फिरायला व दुकानावर जावे लागते. परंतु पहाटे मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने सुसाट जातात. त्यामुळे चालताना मनात भीती असते. अशा वेळी अपघाताचाही धोका अधिक असून, या सुसाट चालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. 
- दत्ता चौधरी  

दररोज सायंकाळी फिरायला जाताना रस्त्यावर सुसाट वाहनांचा त्रास सहन करावा लागतो.  यावर पोलिसांनी कारवाई करून त्यांचे वाहने जप्त करून त्यांना दंड करायला हवा. तसेच वाहन चालविणारे सर्व अल्पवयीन असून, याकडे पालकांनी देखील लक्ष देण्याची  गरज आहे. 
- राकेश मोरे  

कधी कधी सकाळी व सायंकाळी फिरायला रस्त्याच्या कडेने जाताना सुसाट गाड्यांची 
भीती असते. दुचाकी केव्हा जोरात मागून  येईल, याचा भरोसा नसतो. मोकळ्या रस्त्यांवर हे प्रकार खूप होतात. त्यामुळे अशाप्रकारे वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. 
- संगीता कारले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com