
बाधित पोल्ट्री फार्म केंद्रबिंदू पासून अडीच किलोमीटर त्रिज्येत पॅराडाइस, अशरफ आणि पायोनियर असे तीन पोल्ट्री फार्म येतात.
नंदुरबार : नवापूर तालुका व परिसरातील ३ पोल्ट्री फार्ममधील अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांनी संसर्ग केंद्रापासून अडीच किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
आवश्य वाचा- धुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्ण वाढले आणि चाचण्या घटल्या
नवापूरमधील मुस्तबा पोल्ट्री फार्म, सफा पोल्ट्री फार्म, डॉन बी पोल्ट्री फार्म अशा तीन पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित पोल्ट्री फार्म केंद्रबिंदू पासून अडीच किलोमीटर त्रिज्येत पॅराडाइस, अशरफ आणि पायोनियर असे तीन पोल्ट्री फार्म येतात. या क्षेत्रातील सर्व पोल्ट्री फार्म व त्यातील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे, बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करून आणि निगडीत अंडी, पक्षीखाद्य नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत.
आवर्जून वाचा- कुपोषणमुक्तीत नंदुरबार देशात चमकले
निगराणी क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी व पक्षीखाद्य यांचे निगराणी क्षेत्राबाहेर वाहतूक, खरेदी-विक्री, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास ९० दिवसांपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच, १० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील गावे आवागमन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
बाधित क्षेत्रात रिकामे करण्यात आलेले सर्व पक्षीगृहांचे आवश्यक जैवसुरक्षेसह २ टक्के सोडियम हायपोक्लोरेट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. निगरणी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनाच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात यावी व त्या ठिकाणची खासगी वाहने प्रसारित क्षेत्राच्या बाहेर लावण्यात यावी. फार्म सोडताना स्वतःचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निगराणी क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस नियंत्रित करण्यात यावे. निगराणी क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे