भाजपला खिंडीत गाठण्याची काँग्रेसची तयारी

बळवंत बोरसे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून कार्य नसतानाही डॉ. हीना गावित यांनी नऊ वेळा मतदारसंघ राखलेले, ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून नवा इतिहास रचला खरा, पण काँग्रेसने आता भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार सुरू करण्याचे नियोजन चालवले आहे.

मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून कार्य नसतानाही डॉ. हीना गावित यांनी नऊ वेळा मतदारसंघ राखलेले, ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून नवा इतिहास रचला खरा, पण काँग्रेसने आता भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार सुरू करण्याचे नियोजन चालवले आहे.

नंदुरबार जिल्हा आणि गांधी घराणे यांचे नाते अतूट आहे. विजयाचे गणित सोपे असलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि नवा चेहरा हवा म्हणून झालेले मतदान यामुळे काँग्रेसच्या हातून निसटला. नऊवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या माणिकराव गावित यांना लाखांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, काँग्रेसला या निवडणुकीत मिळालेली मते गतवेळच्या निवडणुकीपेक्षाही ६.३१ टक्के जास्तच होती, यावरून आदिवासी जनता काँग्रेसपासून दूर गेलेली नव्हती हेही स्पष्ट होते. 
त्यात भाजपला गड राखण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतील, अशी स्थिती आहे.

भाजपकडून सध्या तरी डॉ. हीना गावित यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असे सध्यातरी दिसते. डॉ. विजयकुमार गावितांनीच काँग्रेसमध्ये यावे आणि लोकसभा लढवावी, असे डावपेच आखले जात होते, मात्र काँग्रेसने सपशेल नकार दिला. खुद्द डॉ. गावितही लोकसभा लढविण्यास फारसे इच्छुक नाहीत.

काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी
भाजपची उमेदवारी डॉ. हीना यांनाच मिळेल असे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित आणि धडगावचे काँग्रेसचे आमदार ॲड. के. सी. पाडवी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक यांनी उमेदवारीसाठी इच्छा दर्शविली आहे. या शर्यतीतून माघार घेत माजी मंत्री पद्माकर वळवींनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. एकूणच काँग्रेस एकदिलाने भाजपला खिंडीत गाठण्यासाठी पावले टाकत आहे.

प्रश्‍न मतदारसंघांचे
    आदिवासींचे स्थलांतर, कुपोषणाचा प्रश्‍न
    बेरोजगारी दूर करण्याचे आव्हान कायम
    शिरपूर, साक्रीचा साखर कारखाना अजूनही बंद
    औद्योगिक, पायाभूत सुविधांचे मागासलेपण

२०१४ चे मतविभाजन
    डॉ. हीना गावित (भाजप) ५,७९,४८७, (विजयी)
    माणिकराव गावित (काँग्रेस) ४,७२,५८१
    अमित वसावे (बीएसपी) १२,१३३

Web Title: BJP Congress Nandurbar Constituency Politics