भाजपच्या मंत्र्यांची अवस्था 'शोले'मधील असरानीसारखी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

..अडचणी सांगत असताना त्यांनी "एकही भूल कमला का फूल', अशी प्रतिक्रिया नोंदवत असताना व्यापाऱ्यांनी "कमल के फूल पर फूल नहीं होंगे', असे म्हणायला मागे-पुढे पाहिलेले नाही.

नाशिक : उमेदवारी दिलेल्या गुंडांना निवडणूक आल्यावर सुधारू असे म्हणणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांची अवस्था "शोले' चित्रपटातील असरानीसारखी झाली आहे. "हम नहीं सुधरे, तो तुम क्‍या सुधरोंगे', हा फेमस डायलॉग त्यांच्यासाठी चपलख बसतो. तसेच शिवसेना - मनसेची स्थिती "आम्ही भाऊ-भाऊ वाटून खाऊ' अशी आहे. त्यातच, सरकार अस्थिर असल्याने भाजप - शिवसेनेतील भांडण कधी मिटणार अन्‌ ते नाशिककडे लक्ष देणार, हा खरा प्रश्‍न आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

महापालिकेच्या प्रचाराची सांगता कॉंग्रेसने मुस्लिमबहुल भागातील वडाळा रोडवर चव्हाण यांच्या सभेने केली. उन्हाच्या तडाख्यात सभास्थानी सावलीची सोय न करण्यात आल्याने अनेकांनी सावलीला बसणे पसंत केल्याने बऱ्याच खुर्च्या मोकळ्या होत्या. चव्हाण यांनी भाजप-शिवसेनेवर चौफेर हल्ला चढवला.

ते म्हणाले, की मंदिर वही बनाएँगे, तारीख नहीं बताएँगे, असे भाजप म्हणत असताना शिवसेना "इस्तिफा देंगे लेकिन तारीख नहीं बताएँगे' असे म्हणत आहे. भाजप - शिवसेनेकडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, म्हणूनच त्यांच्या "रंग-ढंग-सोंगा'कडे जनतेने लक्ष देऊ नये. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत आले असताना त्यांना व्यापारी भेटले होते. अडचणी सांगत असताना त्यांनी "एकही भूल कमला का फूल', अशी प्रतिक्रिया नोंदवत असताना व्यापाऱ्यांनी "कमल के फूल पर फूल नहीं होंगे', असे म्हणायला मागे-पुढे पाहिलेले नाही.

Web Title: bjp ministers are like aasrani in sholay