भाजपच्या काळात नवबौद्धांवरील अत्याचारांत वाढ - राजू वाघमारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

जामनेर - भाजपच्या काळात अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवरील अत्याचारात 34 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते व कॉंग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी शुक्रवारी केला. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केली आहे. कॉंग्रेस ठामपणे पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे व त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार आहे, असे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.

वाकडी (ता. जामनेर) येथे मागास मुलांना मारहाण करून त्यांची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वाकडी येथे पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कॉंग्रेसतर्फे घर देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करू, असे या शिष्टमंडळाने सांगितले आहे. या वेळी झोपडीत मुलांची आजी व मावशीची भेट घेतली. त्यानंतर घटना घडलेल्या विहिरीवर हे शिष्टमंडळ गेले तेथे मुले व त्यांच्या आई - वडिलांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटीले आदी उपस्थित होते. ऍट्रॉसिटी कायद्यात जे बदल करण्यात आले आहे, त्याचा पुनर्विचार व्हावा, पोलिसांनी पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे.

सरकार पीडितांच्या पाठीशी
वाकडी (ता. जामनेर) येथे अल्पवयीन मुलांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून, या घटनेचा कोणीही राजकीय फायदा उचलू नये, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. पीडित कुटुंबातील सदस्यांची त्यांनी आज भेट घेऊन त्यांना धीर दिला.

Web Title: BJP navbauddha Increased atrocities raju waghmare