पंचायत समित्यांवर राहणार 'कमलराज'

पंचायत समित्यांवर राहणार 'कमलराज'
सभापती, उपसभापतींची आज निवड; तीन-चार तालुक्‍यांत चुरस
जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड उद्या (ता. 14) होत असून, जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये "कमलराज' अर्थात भाजपचेच वर्चस्व राहण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. काही ठिकाणी समान संख्याबळ व आरक्षणामुळे सभापती निवडीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड उद्या होत आहे. त्यासाठी प्रत्येक पं. स.च्या ठिकाणी निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. पंधरापैकी बहुतांश ठिकाणी भाजपचे सभापती होणार असल्याची चिन्हे आहेत, तर काही सभापतिपदे शिवसेना व राष्ट्रवादीकडे जातील.

जळगाव भाजप, धरणगाव सेनेचे
जळगाव पंचायत समितीत 10 पैकी केवळ 3 सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. तरीही सभापतिपद ओबीसी महिला राखीव असल्याने भाजपच्या यमुनाबाई रोटे या सभापती होणे निश्‍चित आहे. सेनेचे 5 व 2 अपक्ष सदस्य असले, तरी त्यांच्याकडे ओबीसी महिला उमेदवार नाही. उपसभापतिपदासाठी सेनेने शीतल पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. धरणगाव पं. स.च्या 6 पैकी 5 सदस्य सेनेकडे, तर 1 सदस्य भाजपचा आहे. त्यामुळे या ठिकाणी सेनेच्या मंजूषा पवार यांचे नाव सभापतिपदासाठी निश्‍चित झाले आहे.

जामनेरात भाजपच
जामनेर पंचायत समितीच्या 14 पैकी 10 सदस्य भाजपचे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 4 सदस्य निवडून आले आहेत. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून, भाजपने अद्याप सभापती म्हणून कोणाचेही नाव जाहीर केले नाही. निवडीच्या वेळी ते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

रावेरलाही भाजपचा सभापती
रावेर पं. स.चे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. 12 पैकी भाजपचे 8, राष्ट्रवादीचे दोन, सेना-कॉंग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभापती निवडीसाठी सोमवारी (ता. 13) झालेल्या बैठकीत सभापतिपदी माधुरी नेमाडे आणि उपसभापतिपदी अनिता चौधरी यांची निवड निश्‍चित झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपतर्फे व्हीप जारी करण्यात आला आहे.

भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड कमलमय
भुसावळ पं. स.तील सहापैकी चार भाजप, तर सेना-राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. सभापतिपद ओबीसी राखीव असून प्रीती पाटील व सुनील महाजन यांची नावे चर्चेत आहेत. मुक्ताईनगर पं. स.त आठपैकी सहा सदस्य भाजपचे, राष्ट्रवादी व सेनेचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, भाजपच्या उमेदवार शुभांगी भोलाणे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. बोदवड पं. स.तील सर्व चारही सदस्य भाजपचे असून, ओबीसी राखीव असलेल्या सभापतिपदासाठी भाजपचा उमेदवार ऐन निवडीच्या वेळी जाहीर होणार आहे. या तिन्ही पंचायत समित्यांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे.

अमळनेर, चोपडा भाजपकडे
अमळनेरच्या 8 सदस्यांमध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. अमळनेर पं. स. सभापतिपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून, भाजप सदस्या वजाबाई भिल यांची निवड निश्‍चित आहे. केवळ निवडीची औपचारिकता तेवढी राहिली आहे. चोपडा पंचायत समिती प्रथमच भाजपकडे जाणार आहे. बारापैकी भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5, तर सेनेचे 2 सदस्य निवडून आले आहेत. सभापतिपद खुले असून, भाजपचे आत्माराम म्हाळके यांचे नाव सभापतिपदासाठी निश्‍चित झाल्याचे सांगितले जात आहे.

पाचोऱ्यात भाजप-कॉंग्रेस सोबत
पाचोरा पं. स.च्या 10 जागांमध्ये भाजपचे 5, कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी 1, राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. या ठिकाणी भाजप-कॉंग्रेसमध्ये युती झाल्याचे मानले जात असून, या दोघा पक्षांचे सभापती, उपसभापती होतील अशी चिन्हे आहेत.

पारोळ्यात भाजपवर मदार
पारोळा पं. स.तील 8 पैकी राष्ट्रवादीचे 4, सेनेचे 3, भाजपचा 1 सदस्य असे संख्याबळ आहे. सभापतिपद सर्वसाधारण महिला असून, या ठिकाणी निवडीबद्दल चुरस निर्माण झाली आहे. तथापि, सभापतिपदाची मदार ही पूर्णपणे भाजपवरच अवलंबून आहे. राष्ट्रवादी विरोधात भाजप-सेना युती झाल्यास दोन्ही गटांकडे प्रत्येकी 4 सदस्य होतील व ईश्‍वरचिठ्ठीने निवड होईल, असे मानले जात आहे.

चाळीसगावात ईश्‍वरचिठ्ठी
चाळीसगाव पंचायत समितीत 14 पैकी भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 7 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणीही ईश्‍वरचिठ्ठीने सभापतिपदाची निवड होईल. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून, राष्ट्रवादीच्या जयाबाई पाटील, भाजपतर्फे त्रितल बोरसे यांची नावे चर्चेत आहेत.

एरंडोल सेनेकडे
एरंडोल पं. स.च्या 6 पैकी 4 सदस्य शिवसेनेचे, तर अपक्ष व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 1 सदस्य आहे. सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून माजी सभापती मोहन सोनवणे यांच्या पत्नी रजनी सोनवणे या उमेदवाराची निवड निश्‍चित आहे.

भडगावात सेना-राष्ट्रवादीत युती
भडगाव पंचायत समितीच्या 6 सदस्यांमध्ये सेना 3, राष्ट्रवादी 1 व भाजप 2 असे संख्याबळ आहे. महिला राखीव असलेल्या सभापतिपदी सेनेच्या हेमलता पाटील यांची निवड निश्‍चित मानली जात असून, त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे कळते. भाजपला दूर ठेवण्यासाठी सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावलला चुरस
सभापती निवडीची सर्वाधिक चुरस यावलमध्ये आहे. दहापैकी भाजपचे पाच, कॉंग्रेसचे चार व एक अपक्ष सदस्य आहे. भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना सभापतिपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, भाजप सदस्या संध्या महाजन यांनी त्याला विरोध केला. भाजपने या निवडीसाठी व्हीप बजावला असून, तेव्हापासून संध्या महाजन यांचे पती "नॉट रिचेबल' असल्याने याठिकाणी कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com