भाजप, शिवसेनेने रचला इतिहास; कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पाडला

BJP win panchyayat samitee Elections In Nandurbar
BJP win panchyayat samitee Elections In Nandurbar

नंदुरबार:  जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नंदुरबार जिल्ह्यातील तीन पंचायत समितींवर भाजपने, तर धडगावसारख्या अतिदुर्गम भागातील पंचायत समितीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावून इतिहास रचला आहे. राजकीय पटलावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे, तर शिवसेनेनेही एक पंचायत समिती ताब्यात घेऊन आपले वर्चस्व वाढविल्याचे सिद्ध केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समितींच्या सभापती निवडीत शहादा, नंदुरबार आणि तळोदा येथील सत्ता मिळवीत भाजपने इतिहास रचला आहे. धडगावमध्येही शिवसेनेने प्रथमच भगवा झेंडा फडकावीत पंचायत समिती ताब्यात घेत वर्चस्वाची लढाई जिंकली. कॉंग्रेसकडे अवघ्या दोन पंचायत समित्या आल्या आहेत.
- धनराज माळी, नंदुरबार    

नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात पांरपरिकता आणि परंपराही राहिली नसल्याचे मतदारांनी सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या दक्षिण टोकापासून तर सातपुड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत केवळ "इंदिरामाय'च्या पंजाचीच ओळख असलेल्या अतिदुर्गम भागातील मतदारही आता जागृत व हुशार झाला आहे. मतदाराला कोणी पैशाने अथवा आमिषाने खरेदी करू शकत नाही किंवा पारंपरिक आणि परंपरेच्या नावावर कोणीही सत्ता मिळवू शकत नसल्याचे जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनतेला चांगलेच माहीत झाले आहे.

अक्कलकुवा पंचायत समितीवर आमशा पाडवी यांच्या रूपाने काही वर्षांपूर्वी अक्कलकुवा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला होता. त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात ना कधी भाजपचे फूल उमलले होते, ना कधी शिवसेनेचा धनुष्य पाहिला होता. मात्र, या निवडणुकीत कमालीचे राजकारण झाले. अर्थात राजकीय नेत्यांचे पक्षांतर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मेहनत या बदलात रंगत आणणारी ठरली आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांचे शिवसेना प्रवेश व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश त्यानंतर कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकास्तरावरील नेत्यांची पक्षांतराची भूमिका यावरून जिल्ह्यातील राजकीय समीकरणच बदलून गेले आहे. जे वजनदार नेते ज्या पक्षात गेले त्या पक्षाचे वजन वाढल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावरूनच पंचायत समित्यांमधील वर्चस्व पुढे आले आहे.

ज्या भाजपचे कमळ (वाण्याविहीर वगळता) साध्या ग्रामपंचायतस्तरावर कधी फुलले नाही, त्यांच्यासाठी पंचायत समिती दूरच होती. त्याच भाजपची वाटचाल जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यापर्यंत पोचली आहे. भाजपचे 23 सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत; तर तळोदा, शहादा व नंदुरबार या तीन पंचायत समितींवर पक्षाने निर्विवाद वर्चस्व सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीतून सिद्ध केले आहे. अर्थात यात माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावितांसोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचे कुशल नेतृत्व, त्यांनी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये राखलेला समन्वय व सामंज्यस्य यामुळेच हे सारे काही घडण्यास मदत झाली. हे नाकारून चालणार नाही.

शहादा पंचायत समितीवर वर्चस्वासाठी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी सर्वंकष प्रयत्न केल्याचे उघड आहे, तर तळोदा येथे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, आमदार राजेश पाडवी व ग्रामीण नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले. तेथे अत्यंत बिकट परिस्थिती होती. कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी पाच सदस्य होते. त्यावर तोडगा काढत भाजपची सत्ता स्थापन केली. नंदुरबार पंचायत समितीसाठी खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. गावित व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी एकहाती सत्ता मिळविली.

धडगाव तालुक्याधत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे नेते विजय पराडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेची एकहाती सत्ता मिळविली आहे. अतिदुर्गम भागात शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अक्कलकुवा व नवापूर येथील कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र एकही पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com