शुश्रूषेद्वारे ‘मानव’च्या आयुष्याची दोरी बळकट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

...अन्‌ नाव ठेवले ‘मानव’
ज्याच्या जन्माची नाळ जन्मदात्रीनेच कापली आणि आयुष्याची दोरीही कापण्यासाठी उघड्यावर किड्या-मुंग्यांच्या हवाली केले. मात्र, चिमुकल्याने त्याच्यावर आलेल्या सर्व संकटांवर मात करत आपल्या आयुष्याची दोरी अधिकच बळकट केली. त्यामुळे ‘सिव्हिल’च्या एसएनसीयू कक्षातील परिचारिकांनी त्याचे ‘मानव’ असे नामकरण केले.

नाशिक - दिंडोरीतील पडीक जागेत अर्धवट पुरलेल्या दोन दिवसांच्या अर्भकाला किड्या-मुंग्यांनी चावा घेतल्यानंतर चिमुकल्याच्या रडण्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. पोलिस आले व जखमी अवस्थेतील अर्भकाला जिल्हा रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) दाखल केले. दोन महिने त्यावर उपचार केल्याने कक्षातील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्यावर जीव जडला. त्याचा लळा लागला. या सर्वांच्या प्रयत्नातून जीव जडलेल्या या बालकाची आयुष्याची दोरी बळकट केली. ‘मानव’ असेही नाव ठेवण्यात आले. अखेर ‘मानव’ला गुरुवारी (ता. ६) आधाराश्रमाकडे सुपूर्द केले. त्या वेळी कक्षातील अनेकांना गहिवरून आले. बोलण्यासाठी शब्दही सुचत नव्हते.

गेल्या ९ एप्रिल २०१९ ला दुपारी चारच्या सुमारास दिंडोरीतील पडीक जागेत दोन दिवसांपूर्वी जन्मलेले नवजात पुरुष जातीचे अर्भक अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळले. तिथे त्यास मुंग्या लागलेल्या होत्या. जवळच काही भटके कुत्रेही होती. ये-जा करणाऱ्या नागरिकांना काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांनी जवळून पाहिले तर त्यांना अर्धवट पुरलेल्या स्थितीत अर्भक दिसले.

पोलिसांना खबर मिळताच ते आले. किड्या-मुंग्यांनी चावा घेतल्याने चिमुकल्याची पाठ, तसेच कानालाही जखम झाली होती. त्यांनी त्यास तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल केले. डॉ. पंकज गाजरे, डॉ. कृष्णा पवार व परिचारिकांनी या चिमुकल्यावर उपचार सुरू केले. कक्षात दाखल केले त्या वेळी त्याचे वजन एक किलो ९०० ग्रॅम होते. अंगावरील जखमा व भुकेने व्याकूळ झाल्याने प्रकृती अत्यंत नाजूक होती, पण दोन बालरोगतज्ज्ञांसह सर्वांनीच चिमुकल्याची निगा राखल्याने त्याची आयुष्याची दोरी बळकट झाली. 

बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे, डॉ. कृष्णा पवार, डॉ. नरेंद्र बागूल, डॉ. दिनेश ठाकूर, वर्षा वामोरकर, श्रद्धा पाठक, अंकई पगार, एस. मांडे, बी. कटाळे, किरण सानप यांनी ‘मानव’ची अहोरात्र काळजी घेतली. त्याच्यावर उपचार केले. दिंडोरीच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कामिनी साळवे, चाइल्ड हेल्पलाइनच्या विजया शिंदे यांनीही सतत ‘मानव’साठी पाठपुरावा केला. गुरुवारी (ता. ६) आधाराश्रमाच्या दीपाली पालेकर यांच्याकडे ‘मानव’ला सुपूर्द केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Born baby Life Saving Manav Aadharashram Humanity