बिबट्याच्या जबड्यातून काकाला सोडविले बारा वर्षांच्या पुतण्याने 

Brave child released his uncle on leopard attacked
Brave child released his uncle on leopard attacked

नाशिक : शेतात पाणी भरताना गव्हाच्या पिकात लपलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला; परंतु त्याच वेळी शेतात उपस्थित असलेल्या बारा वर्षांच्या पुतण्याने हुशारी वापरत जवळच पडलेल्या काठ्या बिबट्यावर उगारल्याने बिबट्याला धूम ठोकावी लागली अन्‌ काकाचा जीव वाचला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती... जणू काही याचाच प्रत्यय शनिवारी (ता. 9) गिरणारेवासीयांना आला. 
गिरणारे शिवारात गावापासून साधारण दोन किलोमीटरवर दीपक गणपत पिंगळे (वय 39) यांचे गव्हाचे शेत आहे. शनिवारी दुपारी शेतात पाणी देण्यात मग्न असताना साधारण सव्वाचारच्या सुमारास बिबट्याने दीपक यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. 

काय होते, हे कळायच्या आत बिबट्याने त्यांच्या डाव्या हाताला आपल्या जबड्यात घट्ट पकडले आणि पंजा डोक्‍यावर मारण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याही स्थितीत दीपकने बिबट्याबरोबर झुंज सुरू केली. याच वेळी शेतात त्यांच्यापासून अवघा काही मीटरवर उभा असलेला पुतण्या ओमकार संतोष पिंगळे (12) याने बिबट्याला पाहिले. त्याचीही भीतीने गाळण उडाली; परंतु पुढच्याच सेकंदात सावरत त्याने सुदैवाने अगदी त्याच्याजवळच पडलेल्या काठ्या उचलल्या आणि सरळ त्या जोराने आपटत काकांकडे धाव घेतली. त्याच वेळी दीपकनेही बिबट्याला दुसऱ्या हाताने पकडत आरडाओरडा सुरू केला; परंतु ओमकार तोपर्यंत काठ्या घेऊन काकाजवळ पोचला होता. काठ्यांच्या मोठमोठ्याल्या आवाजाने बिबट्या घाबरला आणि त्याने धूम ठोकत पलायन केले. दीपकने काठी फेकून मारल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. 

परंतु हा थरारक प्रसंग एवढ्यावरच थांबला नाही. रक्‍तबंबाळ अवस्थेतील दीपक यांनी शेताच्या बाजूला लावलेली दुचाकी कशीबशी सुरू केली. त्यांना गाडी चालविणे शक्‍यच नव्हते. हे पाहताच ओमकारने स्वतः गाडी चालविण्याचे धाडस केले. ओमकारने आयुष्यात कधीही दुचाकी चालविलेली नव्हती; परंतु आपल्या काकासमोर उभ्या असलेल्या मृत्यूला दूर नेण्यासाठी चिमुरड्या ओमकारने कशीबशी दुचाकी चालवत काकांना अवघ्या दहा मिनिटांत गावात आणले. गावात शिरलेल्या ओमकारला गाडीला ब्रेक कसे लावायचे, हे माहीतच नव्हते. त्याने ओरडून रस्त्यावर उभ्या असलेल्या गर्दीला दुचाकी अडवायला सांगितली. ग्रामस्थांनीही कशीबशी पकडत दुचाकी रोखली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com