विहिरीतून अठरा तासांनी काढला बहिण-भावाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

अडावद/धानोरा (ता. चोपडा) : धानोरा (ता. चोपडा) येथील मुस्लिमपुऱ्यातील चिमुकल्या बहीण- भावाला एका माथेफिरुने केळीच्या शेतात नेऊन दुष्कर्म करून तेथील 80 ते 100 फूट खोल विहिरीत ढकलून दिले होते. ही घटना शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. रात्रभर विहिरींचा शोध घेतला असता तब्बल अठरा तासांनी विहिरीतून दोघे भाऊ- बहिणीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने धानोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल, अडावदचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील, उपनिरीक्षक गजानन राठोड हे शुक्रवारपासून ठाण मांडून होते. 

धानोरा मुस्लिमपुऱ्यातील रहिवासी शेख इस्ताक यांचा शालक शेख मेहबूब (रा. सुरत, ह. मु. धानोरा) हा आपल्या उपजीविकेसाठी धानोऱ्यात पानटपरी चालवीत होता. त्याला चार मुले असून, त्यापैकी तीन वर्षे वयाचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी हे भाऊ- बहीण शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी पाचपासून बेपत्ता झाले होते. आईने या मुलांचा शोध घेतला असता मुले मिळू शकले नाहीत. त्यामुळे आईने पती शेख मेहबूब यांना सांगितले. मुलांचा शोधार्थ त्यांनी पोलिसपाटील दिनेश पाटील यांनाही माहिती सांगितली.

पोलिसपाटलांनी त्याचाच परिसरात राहणारा शेख खालिद शेख इस्माईल (वय 28) याच्यावर संशय व्यक्‍त केला. त्यांनी त्याची विचारपूस केली. मात्र, सुरवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी त्याला खाकी दाखविल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या घटनेचे वृत्त कळताच काल जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, चाळीसगावचे डीवायएसपी प्रशांत बच्छाव, चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल, अडावदचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील हे रात्री बारापर्यंत घटनास्थळी होते. काल रात्रभर राहुलकुमार पाटील यांनी शोध मोहीम सुरूच ठेवली होती. त्यावेळी चोपडा तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते. 

आज सकाळी अकराच्या सुमारास बिडगाव शिवारातील अनंत बाजीराव पाटील यांच्या मालकीच्या गट क्रमांक 404/1/ब विहिरीत अकराच्या सुमारास 80 ते 100 फूट खोल विहिरीत तब्बल अठरा तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी मृतदेह बाहेर आल्यावर त्यांच्या नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, दोघे बहीण भावाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपी शेख खालिद शेख इस्माईल याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल तपास करीत आहेत. 

अरुणभाईंकडून कुटुंबीयांचे सांत्वन 
धानोरा येथे मुस्लिमपुऱ्यातील चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने चोपडा येथील माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी मृत चिमुकल्यांचे वडील शेख मेहबूब याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पोलिसपाटील दिनेश पाटील, पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: brother sister dead body found in well