माल साठविण्यासाठी बांधणार दोन गुदामे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

२५० टन क्षमतेसाठी ५० लाखांचा होणार खर्च; सभापतींकडून जागेची पाहणी

दोंडाईचा - शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अन्नधान्य, शेतमाल साठवणुकीसाठी तथा बी- बियाणे साठवणुकीसाठी येथील बाजार समितीने २५० टन क्षमतेची दोन नवीन गुदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. बाजार समितीच्या आवारातच या गुदामांचे बांधकाम होणार असून, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, सचिव पी. के. पाटील, उपसचिव विजय पाटील, प्रकाश महाजन, व्यापारी भूपेंद्र गिरासे, व्यापारी संघाचे अध्यक्ष राहुल कवाड, रमेश लखोटे, जयेश शहा, अक्षय शहा यांनी जागेची पाहणी केली.

येथील बाजार समिती लाल मिरचीसह मका, दादर, ज्वारी आदी शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणल्यानंतर बाजारभाव कमी मिळाल्यास आहे त्या दरातच माल विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतमालाला मिळालेला दर पसंत न पडल्यास हा माल घरी न नेता किंवा आहे त्या दरात न विकता बाजार समितीच्या आवारात ठेवण्याची सुविधा उपलब्ध व्हावी व योग्य दर मिळाल्यानंतर तो विकता यावा, या उद्देशाने रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेनुसार २५० टन क्षमतेची दोन गुदामे बांधण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे, अशी माहिती सभापती नारायण पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, की बाजार समितीत शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी बाजार समितीचे प्रथम प्राधान्य असल्यामुळे आगामी काळात रात्री मुक्कामासाठी असलेल्या शेतकरी निवासाचेही नूतनीकरण करण्याचा आमचा मानस आहे. सध्या बाजार समितीत ‘आरओ’चे फिल्टर पाणीही उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नसेल आणि तो माल चांगला दर आल्यावर शेतकऱ्यांची विकण्याची इच्छा असेल तर हे गुदाम बांधल्यानंतर शेतकरी आपला माल याठिकाणी साठवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी अन्य विविध योजना राबविण्याचा मानस असल्याचेही श्री. पाटील यांनी नमूद केले.

Web Title: To build two cargo storage godown