
Nandurbar News : गटारीच्या खड्ड्यात आदळली कार; गटार कायमस्वरूपी बंदिस्त करण्याची मागणी
शहादा : शहरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ श्री महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या समोर पालिकेने बांधलेली गटार दोन ठिकाणी उघडी होती. तात्पुरत्या उपाययोजना करत त्यावर काँक्रिटची फरशी वजा दगड ठेवण्यात आला.
या तात्पुरत्या मलमपट्टीची फरशी निघाली असून, सोमवारी (ता. ३०) दुपारी एक कार त्या खड्ड्यात आदळली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु सुदैवाने त्यात बसलेल्या महिला बचावल्या. या गटारीवर कायमस्वरूपी उपाययोजना करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. (Car crashed into sewer pit Demand for permanent blocking of sewers Nandurbar News)
या मुख्य रस्त्यावरील गटार बांधकामानंतर संबंधित ठेकेदाराने गटारीला बंदिस्त करणे गरजेचे होते. पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा करणे गरजेचे होते. पर्यायाने एक वर्षापासून गटारीची परिस्थिती जैसे थे आहे.
महाराणा प्रताप चौकात चार रस्ते एकमेकांना जोडले गेल्याने सातत्याने रहदारी सुरू असते. लांबून दोन ठिकाणी उघडी असलेली गटार वाहनचालकाला नजरेस पडत नाही. त्यामुळे वाहन सरळ जाऊन खड्ड्यात आदळते. आतापर्यंत दहा ते बारा कार, असंख्य मोटारसायकली, काही विद्यार्थी सायकलींसह पडले आहेत. एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
तात्पुरती मलमपट्टी
पालिका प्रशासनाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रारदेखील केल्या. शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे या संदर्भात पत्रदेखील दिले होते. त्यानंतर पालिकेने दखल घेत फरशी वजा दगड तिथे ठेवण्यात आले; परंतु सोमवारी एक कार दुपारच्या सुमारास त्या फरशीवर गेल्यानंतर ती फरशी उभी झाली व खड्ड्यात जाऊन कार आदळली. त्यात संबंधित गाडीचे मोठे नुकसान झाले; परंतु सुदैवाने त्यातील प्रवासी बचावले. याबाबत पालिकेने दखल घेऊन गटार पूर्ण बंदिस्त करावी, अशी मागणी होत आहे.