"सीईओ" भुवनेश्‍वरी यांची बदली...नेमके कारण काय?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात माजी पदाधिकारी आणि सदस्यांशी एस. भुवनेश्‍वरी यांचे वाद झाले होते. त्यांच्या कार्यप्रणालीविषयीचा वाद विभागीय आयुक्तालयापर्यंत पोचला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सभांमधून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. त्यात एस. भुवनेश्‍वरी यांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता. 16) निघाले. मात्र, त्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवून त्यांना भंडाऱ्याला जावे लागेल, असे दिसते.

माजी पदाधिकारी आणि सदस्यांशी एस. भुवनेश्‍वरी यांचे वाद

 जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात माजी पदाधिकारी आणि सदस्यांशी एस. भुवनेश्‍वरी यांचे वाद झाले होते. त्यांच्या कार्यप्रणालीविषयीचा वाद विभागीय आयुक्तालयापर्यंत पोचला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सभांमधून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. त्यात एस. भुवनेश्‍वरी यांचा समावेश आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा सहा महिन्यांपूर्वी कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्याविषयीच्या प्रशासकीय तक्रारी विभागीय आयुक्तांकडे करत असताना तत्कालीन पदाधिकारी आणि सदस्यांनी 
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही लेखी तक्रारी केल्या होत्या. 

कामकाजाची चौकशी सुरू...
 
विभागीय आयुक्तालयातर्फे जिल्हा परिषदेच्या कामकाजाची चौकशी सुरू केली आहे. 
या चौकशीचे पुढे काय झाले? याची माहिती अद्याप जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेली नाही. अशातच, पालकमंत्री जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्या वेळी विशेषत; अखर्चित निधीचा मुद्दा गाजण्याची शक्‍यता आहे. 
त्याचबरोबर खातेप्रमुखांच्या कारभाराचा पाढा या वेळी वाचला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

महिलाराज संपुष्टात ?

एस. भुवनेश्‍वरी यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 17 जुलै 2019 ला नियुक्ती झाली. अध्यक्षपद शीतल सांगळे, उपाध्यक्षपद नयना गावित यांच्यासह चारपैकी तीन विषय समित्यांच्या सभापती महिला होत्या. त्यामुळे सहा महिन्यांत जिल्हा परिषदेने "महिलाराज' अनुभवले. आता तीन महिलांकडे सभापतिपद आहे. 
मात्र एस. भुवनेश्‍वरी यांची बदली झाल्याने महिलाराज संपुष्टात आले आहे. 

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

अजब प्रशासकीय कारभार... 

जिल्हा परिषदेत एस. भुवनेश्‍वरी यांच्या कार्यप्रणालीबद्दल वादाच्या ठिणग्या पडल्या होत्या. अशातच, जिल्हाधिकारी सूरज मांढरे प्रशिक्षणासाठी गेले असताना जिल्हाधिकारीपदाची प्रभारी सूत्रे त्यांच्याकडे सोपवून अजब प्रशासकीय कारभाराची चुणूक जिल्हावासीयांना पाहावयास मिळाली होती.
हेही वाचा >  लाचखोरीचे बदलले स्वरूप, महसूल दोन कदम आगे...पहा कसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "CEO " Bhubaneshwari's Replacement of bhandara nashik marathi news