कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी छाजेड कुटुंबीयांची होणार कसरत

विक्रांत मते - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नाशिक - स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या छाजेड कुटुंबीयांची जबाबदारी आगामी महापालिका निवडणुकीत वाढली आहे. निवडणुकीत राजकारणातील अनुभव पणाला लावून पक्षाबरोबरच स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याने सत्तेसाठी राजकारण ही भूमिका त्यांना सोडावी लागणार आहे. श्री. छाजेड यांना कॉंग्रेसमधूनच किती साथ मिळते, यावरही त्यांची राजकारणातील लढाई अवलंबून राहील. 

नाशिक - स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या छाजेड कुटुंबीयांची जबाबदारी आगामी महापालिका निवडणुकीत वाढली आहे. निवडणुकीत राजकारणातील अनुभव पणाला लावून पक्षाबरोबरच स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याने सत्तेसाठी राजकारण ही भूमिका त्यांना सोडावी लागणार आहे. श्री. छाजेड यांना कॉंग्रेसमधूनच किती साथ मिळते, यावरही त्यांची राजकारणातील लढाई अवलंबून राहील. 

(कै.) जितमल छाजेड सौंदाणे (ता. मालेगाव) येथून व्यवसायानिमित्त नाशिक शहरात स्थलांतरित झाले. मात्र, गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. घरातच बाळकडू मिळाल्याने जितमल यांच्यानंतर मुलगा जयप्रकाश यांनी 1968 मध्ये कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. दिवंगत संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील युथ कॉंग्रेसमध्ये महाराष्ट्राचे पहिले उपाध्यक्ष व भूविकास बॅंकेचे अध्यक्ष, "एमआयडीसी'चे ते संचालक राहिले. विलासरावांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व सरचिटणीस पदावरून त्यांनी पक्षाला ताकद दिली. ते सध्या कॉंग्रेस इंटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कॉंग्रेसच्या "अच्छे दिन'च्या काळात घराणेशाहीला बळ मिळाल्याने सत्तेच्या राजकारणातही स्थान मिळविण्याची धडपड होती. 1992 च्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पत्नी शोभा यांना गंजमाळ भागातून निवडून आणले. दुसऱ्या वर्षी त्यांना उपमहापौर होण्याचा मान मिळाला. 1992 पासून सलग 17 वर्षे त्या महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा व महिला बॅंकेच्या अध्यक्षा राहिल्या. छाजेड कुटुंबातील ऍड. आकाश यांनी 2011 मध्ये राजकारणात एंट्री केली. सर्वांत तरुण शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सत्तेच्या राजकारणात 2012 मध्ये कॉंग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेच्या सभागृहात त्यांची एंट्री झाली. छाजेड कुटुंबातील प्रीतिश काही काळ युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. संघटना व राजकारणात रमण्याऐवजी छाजेड कुटुंबीयांना कार्यकर्त्यांची रसद पुरविण्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारणात प्रीतिश यांचे काम सुरू आहे. संघटनात्मक पातळीवर शक्तिहिन झालेली कॉंग्रेस यंदाच्या महापालिका निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढणार आहे. त्यामुळे अधिक काळ कॉंग्रेसमध्ये राहिलेल्या छाजेड कुटुंबीयाला पक्षाबरोबरच अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. शोभा, आकाश यांच्याबरोबरच प्रीतिशही या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. कदाचित एकाच घरात दोन कॉंग्रेसचे, एक अन्य पक्षाचा उमेदवार राहिल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण छाजेड कुटुंबीय निवडणुकीकडे अस्तित्वाची लढाई म्हणून पाहत आहे. 

अस्तित्वासाठी लढाई 

एकेकाळी शहर कॉंग्रेसमध्ये दिवंगत मुरलीधर माने व छाजेड गट होते. दोघेही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक. एकाच नेत्यांचे दोन अनुयायी असताना वर्चस्वासाठी त्यांची लढाई होती. दिवंगत माने यांनी छाजेड गटावर कायम मात केली. जयप्रकाश छाजेड यांनी विधानसभेसाठी दोनदा निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, ते पक्षांतर्गत गटबाजीमुळेच. माने यांच्या निधनानंतर शहर कॉंग्रेसवर छाजेड यांनी वर्चस्व निर्माण केले. दिवंगत विलासरावांच्या जवळकीमुळे कॉंग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशिवाय पर्याय राहिला नाही. कॉंग्रेसमध्ये एकीकडे छाजेड गट कार्यरत होत असताना दुसरीकडे विरोधकांची संख्याही वाढत होती. संघटनेतील पदांपासून ते नगरसेवक व अन्य पदांचे वाटप करताना छाजेड यांचाच वरचष्मा राहिला. प्रथम कुटुंबीयांचा व नंतर कार्यकर्त्यांचा विचार करण्याच्या भूमिकेमुळे कालांतराने हक्काचे पदाधिकारीही छाजेडांपासून दुरावले. 2007-12 या पंचवार्षिकच्या काळात महापालिकेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये छाजेड गटाचे वर्चस्व होते. महापौरपदाच्या निवडणुकीत समर्थकांना उमेदवारीपासून दूर ठेवले व विरोधकांना कायम पडद्यामागून मदत करण्याच्या भूमिकेमुळे समर्थक नगरसेवक दुरावले. त्यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. मात्र, त्या सर्वांना पराभवाचे धनी व्हावे लागले. यावरून कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष किती टोकाला गेला आहे, याची प्रचीती येते. 2012 ला ऍड. आकाश यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर श्री. जयप्रकाश यांना पुन्हा टीकेचा सामना करावा लागला. यंदाच्या पंचवार्षिकमध्ये छाजेडसमर्थक नगरसेवकांना सत्तेची पदे मिळाली नाहीत. छाजेड कुटुंबानेही फारसे लक्ष न दिल्याने समर्थक दूर गेले. त्यामुळे यंदाची निवडणूक छाजेड कुटुंबासाठी राजकारणातील अस्तित्वाची लढाई राहील.

Web Title: Chajed family going to work out