रस्त्यांची चाळण देतेय  अपघाताला आमंत्रण 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

रस्त्यांची चाळण देतेय 
अपघाताला आमंत्रण 

रस्त्यांची चाळण देतेय 
अपघाताला आमंत्रण 

जळगाव ः शहरातील गणेश कॉलनी, शिवकॉलनीसह अनेक उपनगरातील शहरात येण्यासाठी मुख्य रस्ता असलेला गणेश कॉलनी ते चित्रा टॉकीज चौकापर्यंतच्या मार्गावर लहान-मोठे तब्बल 158 खड्डे असल्याचे "सकाळ'ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. 
उपनगरातून शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या या रस्त्यावर सतत वाहतूक सुरू असते. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयात जाण्याच्या रस्त्यावरच तब्बल पाच मोठे खड्डे आहेत. महाविद्यालयासमोर आठ खड्डे आहेत. यासह अनेक ठिकाणी रस्त्याची चाळणी झाल्याने दररोज लहान-मोठे अपघाताच्या घटना घडत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचे खड्डे असले तरी महापालिकेचे त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याची तक्रारी वाहनधारकांच्या आहेत. 

कोर्टापर्यंतचा रस्ता चांगला 
चित्रा चौक ते न्यायालयापर्यंत (कोर्टपर्यंत) चांगला रस्ता आहे. खड्डे नाहीत, मात्र वाहनांच्या अतिक्रमणाने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चालताही येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. 

न्यायालयासमोरच खड्डे 
न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच तीन मोठे व दोन लहान खड्डे आहेत. सिंगल रस्ता असल्याने येणारी जाणारी वाहनांची गर्दी होते. न्यायालयात जाण्यासाठी व न्यायालयातून या रस्त्यावर येण्यासाठी वाहन फिरविले की वाहतुकीची कोंडी येथे नित्याचीच बाब बनली आहे. 

गतिरोधकही उखडला 
नूतन मराठा महाविद्यालयासमोरील गतिरोधकाजवळील रस्ता उखडला आहे. मोठा खड्डाही आहे. दावलभक्त रुग्णालयासमोर, प्रतापनगरातून निघणाऱ्या रस्त्यासमोर व तेली समाज मंगल कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासमोर रस्त्याची चाळण झाली आहे. रिंगरोड चौफुली, ख्वाजॉमिया दर्गा, गणेश कॉलनीजवळील व्यापारी संकुलासमोरही खड्डे पडले आहेत. 

मार्गाला 20 ठिकाणी उपरस्ते 
मार्गाच्या दोन्ही बाजूनी शहरातून 20 उपरस्ते जोडलेले आहे. त्यात गुजराथी गल्ली, बॅंक स्ट्रीट, गणेश मंदिराचा रस्ता, गोलाणी मार्केट, विसनजीनगर, तायडे गल्ली, पद्मालय विश्रामगृहाचा रस्ता, रोझ गार्डनचा रस्ता, नूतन मराठा कॉलेज बाजूचा रस्ता, डॉ. दावलभक्त रुग्णालयाजवळचा रस्ता, शाहूनगर, प्रतापनगर, शाहू महाराज रुग्णालयाचा रस्ता, ढाके कॉलनी, कन्या विद्यालय आदी वीस ठिकाणचे उपरस्ते या मार्गाला जोडलेले आहे. 
 

मार्गाची लांबी : 4.5 कि.मी. 
चित्रा चौक ते गणेश कॉलनी (वन वे) : 46 खड्डे 
गणेश कॉलनी ते चित्रा चौक (वन वे) : 71 खड्डे 
मोठे खड्डे : 53 
जोडलेले उपरस्ते : 20 

 

Web Title: chalan