बोंडअळी नुकसान भरपाईसाठी धावपळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

चाळीसगाव - कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. उभे पीक नष्ट होत असल्याने तोंडी आलेला घास हिरावला जात आहे. किमान शासनाने घोषित केलेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. १५ डिसेंबरपर्यंत नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने येथील कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. 

चाळीसगाव - कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. उभे पीक नष्ट होत असल्याने तोंडी आलेला घास हिरावला जात आहे. किमान शासनाने घोषित केलेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. १५ डिसेंबरपर्यंत नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने येथील कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. 

यंदाच्या मोसमात कपाशी पेरणीच्या क्षेत्र वाढ झाली होती. ४७ हजार हेक्‍टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यापैकी जवळपास ३९ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे उभे पीक काढून टाकावे लागत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिके नष्ट करण्यास सांगितले आहे. यामुळे हाताशी आलेले कपाशीचे उत्पन्न गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज सादर करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. येथील तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना प्रपत्र भरून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या प्रपत्रासोबत सातबारा उतारा, कपाशीचा पीकपेरा, आधारकार्ड आदी कागदपत्रेही सादर करावी लागत आहे. त्यामुळे शंभर रुपयांपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शिवाय हे अर्ज भरण्यासाठी गावावरून चाळीसगावला यावे लागत असून भाड्याचाही भुर्दंड सोसावा लागत आहे. 

बारा हजार ३०० अर्ज 
येथील ३२ कृषी पर्यवेक्षक, ८ कृषी सहाय्यक व दोन मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करून घेतले जात आहे. आजअखेर जवळपास २० हजार अर्ज दाखल झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. शहरातील हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले असून या ठिकाणी सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

शेतकरी बांधवांनी केवळ कपाशीचा पीकपेरा असलेला सातबारा उतारा अर्जासोबत जोडावा. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करून नुकसानभरपाईचा लाभ घ्यावा. 
- अविनाश चंदेले, कृषी सहाय्यक, चाळीसगाव 

Web Title: chalisgaon jalgaon news cotton worm compensation