नाशिक : बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी सक्रिय

रोशन खैरणार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील नवे निरपूर शेतकरी गोरख चिंधा कचवे यांच्या शेतातून दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे चोरून पोबारा केला. याबाबत कचवे यांनी वनविभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

सटाणा  : बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील नवे निरपूर शेतकरी गोरख चिंधा कचवे यांच्या शेतातून दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे चोरून पोबारा केला. याबाबत कचवे यांनी वनविभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

 नवे निरपुर येथील शेतकरी गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातिच्या ३०० चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने श्री.कचवे यांनी चंदनाची झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा यासाठी वनविभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि दोन फुटाचे तुकडे करून पोबारा केला. याबाबत वनविभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर कचवे हे सटाणा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केळ्याचे श्री.कचवे यांचे म्हणणे आहे.

 दरम्यान, गेल्या वर्षी देखील चंदन तस्करांच्या टोळीने श्री.कचवे यांच्या शेतातून एक फुट व्यासाचे चंदनाचे झाड कापुन नेले होते. त्यावेळी त्यांनी सटाणा पोलीस ठाणे आणि वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र चंदन तस्करांचा ठावठिकाणा लावण्यात तपास यंत्रणेला अपयश आले होते. पोलिस आणि वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन चंदन तस्करांना जेरबंद करावे आणि संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील चोरीस गेलेल्या झाडांचा पंचनामा करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, सदस्य कुबेर जाधव, गोरख कचवे रमेश अहिरे, कडु पाटील आदींनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandan smugglers gang active in Baglan taluka