पुण्यातील फडणीस ग्रुपविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

नाशिक : पुण्यातील प्रसिद्ध फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. या कंपनीविरोधात अखेर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलिसांत दाखल करण्यात आला. गेल्या कित्येक महिन्यांपासून यासंदर्भात गुंतवणूकदारांकडून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. परंतु, कंपनीकडून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाईल, असे आश्‍वासन पोलिसांना दिले जात होते.

गुंतवणूकदार मधुकर भास्कर देशपांडे (रा. देशपांडे गल्ली, नेवासे खुर्द, ता. नेवासे, जि. नगर) यांनी याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली. संचालक विनायक प्रभाकर फडणीस, अनुराधा विनय फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री सचिन गुरव, सायली फडणीस-गडकरी, मनोज ऊर्फ तुषार बापूराव कुलकर्णी (सर्व रा. प्रेसिडेन्स हाइट्‌स, श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक) यांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना बॅंकेपेक्षा जादा व्याजदराचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. देशपांडे यांनी मे 2011 मध्ये गुंतवणूक केली होती.

रकमेची मुदत एप्रिल 2016 मध्ये संपल्यानंतरही त्यांना गुंतविलेली रक्कम व व्याज न देता फडणीस कंपनीने 16 लाख 73 हजार 386 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले. नाशिकमधीलही अनेक गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदने देऊन संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. तत्कालीन आयुक्त एस. जगन्नाथन यांनीही या संदर्भात कंपनीकडे पाठपुरावा केला असता, कंपनीचे संचालक विनायक फडणीस यांनी गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, कंपनीने अद्यापही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केलेले नाहीत. अखेर मुंबई नाका पोलिसांत फडणीस ग्रुपविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Web Title: charges against pune's fadnis group in nashik