चेतक फेस्टिव्हल : घोडे विक्रीतून 15 लाखांची उलाढाल 

रमेश पाटील
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

कोल्हापूर येथील संतोष भोकरे यांनी दोन लाख 55 हजारांचा घोडा खरेदी केला. मोहम्मद लईक (रा. बरेली, उत्तर प्रदेश) यांनी हा घोडा विकला. यावेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पाटील आदी उपस्थित होते.

सारंगखेडा (ता. शहादा) : काळ झपाट्याने आणि वेगाने बदलतो आहे. पण प्राचीन काळापासून ते आजच्या मर्सिडीज कारच्या युगातही दळणवळणाचे साधन असलेल्या घोड्यांबाबतचे आकर्षण कायम आहे. तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि "शोले'पासून "बाहुबली'पर्यंतच्या विविध चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरविणाऱ्या सारंगखेडा यात्रोत्सवातील घोडे बाजारात उच्चप्रतीच्या घोड्यांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. त्यात गेल्या दोन दिवसांत घोडे विक्रीतून दहा लाखांची उलाढाल झाली. 
 
येथील घोडे बाजारात विशेषतः पंजाब, सिंध, काठेवाडी, मारवाड तसेच गावरान घोड्यांचा समावेश आहे. त्यात पांढऱ्या घोड्यांची संख्या अधिक आहे. काही जण घोडेस्वारी, टांगा, लग्नसोहळ्यासाठी घोडे खरेदी करतात. काही जण रेसकोर्स, घोडेसवारी, अश्‍व प्रदर्शन, स्पर्धा तसेच चित्रपट चित्रीकरणासाठी, लष्करासाठी घोडे खरेदी केली जातात. काही शौकीनमंडळी हौसेखातर घोडे खरेदी करतात. देशातील 15 राज्यांतून घोडे विक्रीसाठी आले आहेत. विविध प्रांतातील विविध भाषा, संभाषण यामुळे परिसर गजबजून गेला आहे. 

संबंधीत बातम्या > ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला नव्या नव्या सरकारने पाठबळ द्यावे : रावल

अश्‍व स्पर्धेचे आकर्षण 
"चेतक फेस्टिव्हल'तर्फे अश्‍व स्पर्धा घेण्यात येतात. त्यांना 15 डिसेंबरपासून सुरवात होईल. यात अश्‍व प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा आदींचा समावेश आहे. अश्‍वशौकीन स्पर्धेतील सहभागासाठी आपल्या घोड्यासह येथे दाखल होत आहेत. स्पर्धा चेतक व्यासपीठाच्या प्रांगणात घेतल्या जाणार आहेत. 

क्‍लिक करा > चेतक फेस्टिव्हल ः सीसीटीव्हीची नजर 

घोड्यांची खरेदी-विक्री सुरू 
येथील घोडे बाजारात घोड्यांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत 15 घोडे विक्रीतून दहा लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. 

"पंचकल्याणी'ला मागणी 
घोड्याच्या लक्षणांवर किंमत ठरविली जाते. दारातील घोडा शुभ लक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभ लक्षणीय घोड्याचा दाम लाखांवर असतो. "पंचकल्याणी' घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही पाय ढोपराखाली शुभ्र असतात. डोळे घारे असतात. या डोळ्यांना "जयमंगल' असे संबोधले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chetak festival sarangkheda horse 15 lakh