esakal | ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला नव्या सरकारने पाठबळ द्यावे 
sakal

बोलून बातमी शोधा

jaykumar rawal

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला नव्या सरकारने पाठबळ द्यावे 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : तब्बल साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथील एकमुखी श्री दत्तांच्या यात्रेला,या आनुषंगिक चेतक महोत्सवाला विघ्नसंतोषींची दृष्ट लागते की काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. औद्योगिकदृष्ट्या मागास नंदुरबार जिल्ह्यात रोजगारासह उलाढालीला पूरक, देशभरात पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेली ही यात्रा व महोत्सव खानदेशची अस्मिता ठरली आहे. ती उंचावत जावी आणि गुणात्मक दर्जा वाढीसाठी तिला राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारने भरभक्कम पाठबळ देण्याची गरज पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. 

नक्‍की पहा > दहा कोटींचा "शान' 


देशात जातिवंत अश्‍वांच्या खरेदी- विक्रीसाठी ही यात्रा, चेतक महोत्सव प्रसिद्ध आहे. सर्वांत महागडा आणि कमी उंचीचा अश्‍व हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरते. ते खरेदीसाठी देशभरातून बडे व्यावसायिक, चित्रपट सृष्टीतील तारे, अश्‍वप्रेमी सारंगखेड्यात हजेरी लावतात. पूर्वी सर्वसाधारणपणे भरणारी आणि खानदेश विभागापुरतीच मर्यादित राहणारी ही यात्रा देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला यावी म्हणून तत्कालीन भाजपप्रणीत सरकारमधील पर्यटन, रोहयो, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री तथा या पक्षाचे शिंदखेडा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी चेतक महोत्सवाच्या माध्यमातून या यात्रेला वेगळी ओळख करून देण्यासाठी धडपड सुरू केली. 

क्‍लिक करा > चेतक महोत्सव ः सीसीटीव्हीची नजर 


सारंगखेडा येथे तापी नदीकाठी साडेचारशे वर्षांपासून ही यात्रा भरते आहे. त्यावेळी नदीकाठी युद्धातील घोडे विश्राम करत आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पाणी पातळी कमी झाल्यावर ते नदीतून दुसरा किनारा गाठत. याच स्थळी ही ऐतिहासिक यात्रा वर्षानुवर्षे भरते आहे. दरवर्षी मनोरंजनासह अश्‍वांच्या खरेदी- विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. सध्या ही यात्रा सुरू झाली आहे. औद्योगिक, रोजगारदृष्ट्या मागास सारंगखेड्यासह आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील या यात्रेला चेतक महोत्सवाची जोड दिली, तर नवे पर्यटन स्थळ विकसित होऊ शकेल. या माध्यमातून रोजगारासह विकासाला चालना मिळून देशपातळीवर खानदेशचा नावलौकिक वाढू शकेल, याद्वारे जगभरातील पर्यटकांची पावले सारंगखेड्यातील यात्रेकडे वळतील या दृष्टीने आमदार रावल यांनी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारने पाठबळ दिले, तर रोजगारासह यात्रा, चेतक महोत्सव चालेल यात शंका नाही.