राष्ट्रवादीच्या प्रचारपत्रकावरून भुजबळांची छबी गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची छबी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारपत्रकावरून गायब झाली आहे. प्रचारपत्रकावर भुजबळ यांचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे नाही, असे संकेत प्रदेशस्तरावरून देण्यात आल्याने भुजबळांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सक्तवसुली विभागाच्या (ईडी) कारवाईमुळे भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे तुरुंगात आहेत. राजकीयदृष्ट्या झालेल्या कारवाईमुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारपत्रकावरून भुजबळ यांची छबी गायब होईल, याबाबत भुजबळ समर्थकांना कल्पना नव्हती. दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यानिमित्त लावलेल्या फलकावर भुजबळ यांचे छायाचित्र नव्हते. त्याबद्दलचा रोष वाढताच, मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या फलकावर भुजबळ यांचे छायाचित्र लावण्यासाठी राष्ट्रवादीला प्रयत्न करावे लागले आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भुजबळ हे कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादीमध्ये सक्रिय राहिले आहेत. इतर मागासवर्गीय समाजाच्या समर्थनासाठी त्यांनी देशभरात कार्यक्रमांची आखणी केली. असे असतानाही भुजबळ यांना का डावलेले जाते?, अशी विचारणा समर्थकांमधून होऊ लागली आहे.

Web Title: chhagan bhujbal has no place in ncp campaign