चंगळवादामुळेच बिघडली तरुण मुले

दीपक कच्छवा
गुरुवार, 3 मे 2018

आपली मुले रात्री कुठे जातात, काय करतात, याची प्रत्येक पालकाने विचारपूस केली पाहिजे. मुलांना घरात येताना वडील या नात्याने त्यांची चौकशी केलीच पाहिजे. किमान या भीतीने तो व्यवस्थित घरी तरी येईल. मात्र या घटनेतील मुलांवर त्यांच्या पालकांचेच लक्ष नसल्याने दरोडे टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे दिसून येत आहे. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बऱ्याच सुशिक्षित कुटुंबातील आई- वडिलांना विविध कारणांमुळे मुलांकडे पाहण्यास वेळ नसतो. अशातच चंगळवादामुळे अनेकांची मुले अवास्तव खर्च करतात. त्यात त्यांची पुढची पिढी मद्यपी होऊन रस्ता लुटीसारखे प्रकार करण्यापर्यंत जेव्हा जातात, तेव्हा समाजमन सुन्न होते. मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेतून हेच समोर आले आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या चांगल्या कुटुंबातील उच्च शिक्षित असलेले करण राठोड, कल्पेश निकम, मयुर चौधरी, कमलेश पाटील, निखिल पाटील, अरुण पाटील यांच्यासह अजून चार तरुण (ज्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत) या तरुणांनी चांगलाच पराक्रम केला. येथील रहिवासी तथा वडगाव मुलाणे (ता. पाचोरा) येथे ग्रामसेवक असलेल्या भोलू शेख व त्यांच्या कुटुंबीयांना या मद्यपी तरुणांनी मेहुणबारेत त्यांचे वाहन रोखून रस्तालुटीच्या इराद्याने मारहाण करून लुटले. मात्र, या तरुणांनी केलेले कृत्य तरुणांना खूपच महाग पडले. या कृत्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतल्याचे दिसत आहे. सध्या हे तरुण पोलिस कोठडीत आहेत. त्यांची पोलिसांनी माहिती घेतली असता, पोलिसही अवाक झाले. या तरुणांमध्ये बी. एस्सी.चे शिक्षण घेणारे दोघे जण आहेत. तर दोन भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत. एक तेरावीत तर दुसरा बारावीत शिकत आहे. एक तरुण जळगावला नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीला देखील गेलेला होता. या कृत्यामुळे त्याचे पोलिस होण्याचे स्वप्न भंगले आहे. केवळ "व्यसनांची संगत संपवी आयुष्याची संगत' याचाच प्रत्यय या झालेल्या प्रकारातून दिसून येत आहे. 

मुलांवर वचक ठेवा 
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एकाच छताखाली राहणाऱ्यांना दुसऱ्याबाबतची माहिती नसते. पैसा कमावून समाजात दिमाखदारपणे वावरणाऱ्या पालकांना आपल्या मुलांविषयी काळजी व वेळ नाही. म्हणून मुलांच्या तोंडावर हवा तेवढा पैसा फेकला, की आपण आपली जबाबदारी पार पाडली, असाच समज बहुतांश श्रीमंत पालकांचा झाला आहे. वारेमाप पैसा खिशात खेळायला लागल्यावर तरुणांनाही संगतीचे भान राहात नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना इतकीही मोकळीक देऊ नये की त्यांचा पाय चुकीच्या मार्गावर पडेल. 

व्यसनाधीन झाली तरी कधी? 
मेहुणबारे  पोलिसांनी अटक केलेल्या सहा तरुणांची घरची परिस्थिती अतिशय चांगली आहे. या मुलांचे पालक डॉक्‍टर, ग्रामसेवक, सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. एकाचा भाऊ आरोग्य खात्यात चांगल्या पदावर आहे. एवढी चांगल्या घरातील मुले, जी चांगल्या संस्कारात वाढली, ती व्यसनाधीन कधी व कशी झाली? याचे उत्तर आता त्यांचे कुटुंबीय नक्कीच शोधत असावे. 

आपली मुले रात्री कुठे जातात, काय करतात, याची प्रत्येक पालकाने विचारपूस केली पाहिजे. मुलांना घरात येताना वडील या नात्याने त्यांची चौकशी केलीच पाहिजे. किमान या भीतीने तो व्यवस्थित घरी तरी येईल. मात्र या घटनेतील मुलांवर त्यांच्या पालकांचेच लक्ष नसल्याने दरोडे टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे दिसून येत आहे. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

Web Title: children in crime