शहरातील खुल्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नागरिक स्वत: मोकळ्या जागेत कचरा टाकून स्वत:चे आरोग्य धोक्‍यात घालत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडी व कचराकुंडीतच कचरा टाकावा. तसेच शहरातील शंभर टक्के कचरा उचलण्याचा नियोजन आराखडा उद्या (ता.१४) आयुक्तांकडे सादर करणार असून त्यावर लवकरच काम सुरू करणार आहे.
- उदय पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका

जळगाव - शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर पावसाचे साचलेले पाणी त्यातच साचलेल्या कचऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडून कचराच उचला जात नसून याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे खासगी मालकीच्या भूखंडांवरही घाणीचे साम्राज्य असून या जागांच्या सफाईची जबाबदारी कुणाची, हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

शहरात ठिकठिकाणी असलेले खुले भूखंड मोठी समस्या बनले आहेत. मनपा व खासगी मालकीच्या खुल्या जागांवर पावसाचे पाणी साचून तसेच कचराही साचल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही या जागांवरील कचऱ्याची सफाई होत नाही. त्यामुळे हे खुले भूखंड डोकेदुखी बनले आहेत.

पूर्ण कचरा उचला जात नाही
मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील प्रभागामधील विविध वार्डामध्ये स्वच्छता कर्मचारी व्यवस्थित सफाई केली जात नसल्याची ओरड कायम होत असते. व्यवस्थित साफ सफाई होत नसल्याने कचरा तसाच राहून मोकळ्या जागेत पसरून दुर्गंधी पसरते.

सफाईची जबाबदारी कुणाची?
महापालिकेच्या खुल्या जागांवर उकिरडे झाले असून तेदेखील मनपाकडून साफ केले जात नाही. शिवाय खासगी प्लॉटवरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे, मनपा अशा मालकांकडून खुल्या भूखंड कराच्या रुपात कर आकारते. त्यामुळे या भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारीही मनपाची आहे, असा दावा नागरिक करतात.

मनपाची सफाई यंत्रणा अपूर्ण
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांची तसेच वाहन व्यवस्था देखील अपुरी असल्याने शहरातील सर्वत्र कचरा उचला जात नाही. शहारात आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी ४५० तर मक्तेदांरांचे ३०० कर्मचारी असून आरोग्य विभागाकडे कचरा उचलण्याची वाहन व्यवस्था देखील अपूरी आहे.

नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा
मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासीच कचरा अधिक प्रमाणात टाकतात. नागरिकांनी स्वःची जबाबदारी ओळखून कचरा घेण्यासाठी येणाऱ्या घंटा गाडीत कचरा टाकवा.  त्यामुळे परिसर स्वच्छ राहण्याचे चित्र आपणास दिसेल असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Cities in the ditch on the open plots Empire