नाशिकबाबत दुजाभाव करणाऱ्या भाजपला विचारा जाब

नाशिकबाबत दुजाभाव करणाऱ्या भाजपला विचारा जाब

नाशिक - नाशिक शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न, स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्याबरोबरच नाशिकला उद्यानांचे शहर म्हणून लौकिक मिळवून दिला. नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक, बौद्ध स्मारक, यशवंतराव चव्हाण तारांगण आदी बाबींची उभारणी करून नाशिकच्या विकासाची पायाभरणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. शिवसेनेबरोबर सत्तेत राहिलेल्या भारतीय जनता पक्षाने नाशिकसाठी काय केले, याचे उत्तर मागण्याबरोबरच भाजपने नाशिकला काय दिले, याची यादी करायचीच झाली तर नाशिकचे पिण्याचे पाणी जायकवाडीत पळवून औरंगाबादच्या मद्य कारखान्यांना ते पुरविले. नाशिकच्या विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे विभाजन करून नाशिक कल्याणला जोडले. नाशिकपेक्षा मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना स्वस्त वीज देऊन नाशिकचे उद्योग संकटात टाकले. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याचा घाट घातला आदी अनेक गोष्टी मांडता येतील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमुळे झालेल्या नाशिकच्या नुकसानीची जंत्रीच सांगितली. नाशिकचा विकास करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात दिसले आहे. नाशिकच्या विमानतळाचाही प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला, तसेच पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत सर्वाधिक निधी नाशिकमध्ये आणून पर्यटन केंद्रांचा मोठा विकास केल्याचा दावा या नेत्यांनी केला.

‘सकाळ’च्या कार्यालयात उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या अध्यक्षतेखाली ‘नाशिककरांचा अजेंडा’ याविषयावर बैठक झाली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयवंत जाधव, ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, मुख्तार शेख, किशोर शिरसाठ उपस्थित होते. नाशिकच्या विकासासंबंधी त्यांनी चर्चा करून नागरिकांच्या अपेक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी या शहर विकासाच्या संकल्पनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येईल, असे सांगितले. ओझर येथे अत्यंत सुंदर विमानतळ उभारूनही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला श्रेय जाईल, यामुळे विद्यमान राज्य सरकार नाशिकची विमानसेवा सुरू करण्यात अडथळे आणत असल्याचाही त्यांनी आरोप केला. 

येत्या महापालिका निवडणुकीत शहरातील नागरिक व तज्ज्ञांच्या मदतीने ‘सकाळ’ने तयार केलेला नाशिक अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सामाविष्ठ करून सत्तेवर आल्यानंतर तो पूर्णपणे राबवून विकसित नाशिकचे स्वप्न साकार केले जाईल, असेही या नेत्यांनी सांगितले.

नागरिकांचा अजेंडा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात
चटई क्षेत्राबाबत लहान भूखंडधारकांवरील अन्याय दूर करणार
गोदावरी स्वच्छतेसाठी कृती कार्यक्रम राबविणार
उद्याने वाचविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणार
मुकणे धरणावरील जलवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करणार
कृषी अर्थव्यवस्था व नागरी विकास यांचा समन्वय साधून करणार विकास
जुन्या नाशिकच्या गावठाण क्षेत्राचा विकास करणार
पूरनियंत्रण रेषेबाबत निश्‍चित धोरण ठरवून ते राबविणार

राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असताना इंडियाबुल्सने नाशिकचे मलनिस्सारण केंद्र स्वखर्चाने चालवून शुद्ध केलेले मलजल वीजनिर्मिती केंद्रासाठी नेण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. या प्रस्तावामुळे मलनिस्सारण केंद्रावरील मोठा खर्च वाचला असता. परंतु नंतर सत्तेत आलेल्या युतीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना पोसण्यासाठी हा प्रस्ताव नाकारत मलनिस्सारण केंद्र चालविण्याचा खर्च सुरूच ठेवला आहे.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

नाशिकच्या लोकांचे हक्काचे गंगापूर धरणातील पाणी मानवतेच्या नावाखाली जायकवाडीला नेले. ते पाणी औरंगाबादमधील उद्योग व मद्याच्या कारखान्यांसाठी वापरले गेले. नाशिकवर अन्याय करून नागपूर, मराठवाड्यातील प्रकल्पांना झुकते माप देण्याचे भाजप सरकारचे धोरण आहे. नाशिकच्या तुलनेने मराठवाडा व विदर्भातील विजेचे दर कमी असल्याने नाशिकच्या उद्योगांसमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- जयवंत जाधव, आमदार  

नाशिक कृषी क्षेत्रातील आघाडीचा जिल्हा आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्था व नागरी विकास यांचा समन्वय साधून प्रकल्प राबविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. नाशिकच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेऊन शांतारामबापू वावरे महापौर असताना आम्ही मुकणे धरणाचा ठराव महासभेत मंजूर केला होता. त्या धरणाच्या कामाची निविदा निघूनही भाजप आमदारांच्या आडकाठीमुळे काम थांबले आहे. 
- नानासाहेब महाले, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 

शहराच्या लोकसंख्येची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आमच्या कार्यकाळात महापालिकेचे स्वतःचे धरण असावे, असा निर्णय झाला. खरंतर आतापर्यंत धरणाचे काम होणे अपेक्षित होते. मात्र भाजप-शिवसेनेला ते करता आले नाही.
- निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 

शहराचा विकास आराखडा जाहीर झाला; पण त्यात जुने नाशिकमधील गावठाणाचा विकास करणे व पूररेषा याबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. जुन्या नाशिकमध्ये अनेक वाडे व मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्या विकसित झाल्याशिवाय जुन्या नाशिकच्या गावठाणाचा विकास अशक्‍य आहे. जुन्या नाशिकच्या गावठाण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निश्‍चित लोकहिताचे धोरण ठरवेल. 
- संजय खैरनार 

शहराच्या विकासात विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ही बाब लक्षात घेऊन माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण करून ओझर येथे नवीन विमानतळाची उभारणी केली. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे सरकार विमानसेवा सुरू करण्याबाबत उदासीन आहे. नाशिकमध्ये मोनोरेल सुरू करून वेगवान वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविला जाईल.
- अर्जुन टिळे 

राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपतर्फे केला जात होते. परंतु आता तर शहरातील सर्व नामचीन गुंडांना भाजपने आश्रय दिला आहे. यामुळे भाजपचा ढोंगीपणा उघडकीस आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेले आरोप चुकीचे होते, हेही सिद्ध झाले.
- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

सरकारने कमी आकाराच्या भूखंडांचे चटईक्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या सामान्य नागरिकांनी लहान आकाराचे भूखंड खरेदी करून घर बांधण्याचे स्वप्न बघितले होते, त्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मोठ्या विकासकांच्या फायद्याचे धोरण घेणाऱ्या सरकारने नागपूरसाठी मात्र अनेक सवलती दिल्या आहेत. भाजप सरकार नाशिकबाबत दुजाभाव करीत आहे.
- किशोर शिरसाठ 

पावसाळी गटार योजना चुकीच्या पद्धतीने राबविली गेल्याने नाशिकचे मोठे नुकसान झाले आहे. उद्याने भकास झाल्यामुळे नाशिकचे वैभव लयास गेले आहे. यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करून उद्याने वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच गोदावरी स्वच्छतेसाठीही निश्‍चित धोरण राबविले जाणार आहे.
- मुख्तार शेख, प्रांतीक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com