आरक्षणाबाबत मराठ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

न्यायालयात आरक्षणाच्या संदर्भात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची मोठी टीम कार्यरत असून, सुमारे 2700 पानांचे पुरावे सरकारने तयार केले आहेत.

- चंद्रकांत पाटील

जळगाव : "गेल्या आठवड्यात मराठा समाजाच्या कोल्हापूर येथे झालेल्या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या प्रतिनिधींची सरकारशी चर्चेची तयारी असल्याचे ठरले आहे. त्यानुसार या परिषदेत नियुक्त समितीशी मुख्यमंत्री स्वत: येत्या आठवडाभरात आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करतील," अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यासंदर्भात पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयात आरक्षणाच्या संदर्भात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची मोठी टीम कार्यरत असून, सुमारे 2700 पानांचे पुरावे सरकारने तयार केले आहेत," असे ते म्हणाले. 

वाळूधोरण ठरविण्यासाठी समिती
दरम्यान, 'राज्यात अवैध वाळू वाहतुकीचा विषय बिकट बनला आहे. त्यावर दीर्घकालीन उपायासाठी एकूणच वाळू धोरण ठरविण्यासाठी सरकारने दोनसदस्यीय समिती नेमली आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सरकारी डेपोच्या माध्यमातून वाळू उपसा व विक्री करण्याचा विचार आहे. त्यासाठी राज्यातील 350 तालुक्‍यांत तेवढेच डेपो करावे लागतील. अशा सर्व बाजूंनी ही समिती अभ्यास करून अहवाल सादर करेल,' अशी माहितीही महसूलमंत्र्यांनी दिली.
 

Web Title: cm fadnavis to talk with marathas on reservation issue