ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या इमारतीने टाकली कात

सुदाम गाडेकर
गुरुवार, 23 मार्च 2017

नगरसूल - जीर्ण व मोडकळीस आलेली नगरसूल (ता. येवला) येथील घनामाळी मळा जिल्हा परिषद शाळेची इमारत ग्रामस्थांच्या देणगीमुळे पुन्हा भक्कम व आकर्षक बनली आहे. 

नगरसूल - जीर्ण व मोडकळीस आलेली नगरसूल (ता. येवला) येथील घनामाळी मळा जिल्हा परिषद शाळेची इमारत ग्रामस्थांच्या देणगीमुळे पुन्हा भक्कम व आकर्षक बनली आहे. 

शासकीय निधीची वाट न पाहता बालकांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी इमारत दुरुस्तीचा संकल्प केला. इमारत मजबूत करून शाळा डिजिटल केली. बालकांच्या शिक्षणालाच बळ दिल्यामुळे शाळेचे रूपडे पालटले आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी शाळा दुर्लक्षित होत आहेत. पालकांचाही ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत आहे. आशा परिस्थित ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळा इमारतीसह अखेरच्या घटका मोजत आहेत. आशा परिस्थितीत घनामाळी मळ्यातील ग्रामस्थांनी सरपंच प्रसाद पाटील यांच्या पुढाकारातून लोकवर्गणी उभी करून इमारत मजबूत करून शाळा डिजिटल केली आहे. 

शिक्षण उपयोगी साहित्य व इमारत बोलकी झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येथील सरपंच प्रसाद पाटील, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, ॲड. मंगेश भगत, धनाजी पैठणकर, अनिल पैठणकर, दिलीप पैठणकर, मुख्याध्यापिका सुनीता अहिरे, जयश्री हाडके आदींच्या सहकार्यामुळेच शाळा टुमदार बनली आहे.

Web Title: collaboration of the villagers