दाजी, माझ्या लग्नाला नक्की यायचं हं!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

येवला : दाजी, माझ्या लग्नाला नक्की यायचं हं... असा हट्ट सायगाव येथील राणीने मोबाईल वर सवांद साधतांना आठवड्यापूर्वी धरला आणि दाजी असलेले शहिद किरण थोरात यांनी राणीसह पत्नी आरतीला आश्वासक शब्द देत सुट्टीवर येतो, असेही सांगितले होते. मात्र हे बोलणे व आनंदाचे क्षण नियतीने अर्धवटच ठेवले.

येवला : दाजी, माझ्या लग्नाला नक्की यायचं हं... असा हट्ट सायगाव येथील राणीने मोबाईल वर सवांद साधतांना आठवड्यापूर्वी धरला आणि दाजी असलेले शहिद किरण थोरात यांनी राणीसह पत्नी आरतीला आश्वासक शब्द देत सुट्टीवर येतो, असेही सांगितले होते. मात्र हे बोलणे व आनंदाचे क्षण नियतीने अर्धवटच ठेवले.

बुधवारी जम्मू-काश्मिर मधील पुंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या अनपेक्षित हल्ल्याला प्रतिकार करत असता कृष्णाघाटी सेक्टर मधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण पोपरराव थोरात (३१,रा.फरिदाबादवाडी ता. वैजापूर जि. औरंगाबाद) हे शहीद झाले.

या घटनेने वैजापुरसह येवला तालुक्यातील सायगाववरही शोककळा पसरली आहे. शहिद किरण हे सायगाव येथील सुकदेव आनंदा भालेराव यांचे लाडके जावई. २४ एप्रिलला आपल्या मेहुणीचाच्या विवाहाला ते येणार होते. तसा शब्द किरणने पत्नीला व मेहुणी राणीला दिला होता. मेहुणीच्या लग्नात येऊन मिरवायचे, नातेवाईक, परिवाराच्या भेटीगाठी घेऊन आनंदात सुट्टी घालविण्याचा त्याचा मानस होता मात्र नियतीने या स्वप्नाचा चक्काचूर केला.

जावई देशसेवा करत असल्याचा सार्थ अभिमान सतत भालेराव परिवाराला वाटायचा. चार वर्षांपूर्वीच किरणचा आरतीशी थाटामाटात विवाह झाला होता. मोठी मुलगी चिऊ अडीच वर्षांची आणि केवळ पाच महिन्यांचा मुलगा श्लोक अशी आपत्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी किरण थोरात सुट्टीवर आले होते. मुलगा झाल्याच्या आनंदानं सारा परिवार सुखावला होता. चार दिवस आपल्या नवजात लहान मुलाचं, मुलीचं कोडकौतुक करून प्रपंचाचे रेश्मी पाष दुर सारून किरण थोरात पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी सिमेवर दाखल झाले.

किरणच्या निधनाची वार्ता बुधवारी रात्री कळताच भालेराव परिवारासह सायगाव वर शोककळा पसरली. सोशल मिडीयावरून फोटो, माहिती, भावपूर्ण श्रद्धांजलीचा वर्षाव सुरु झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा,भाऊ, भावजयी असा परिवार आहे. 

Web Title: come to my marriage said by sister in law of jawan kiran thorat