गोदावरी पुन्हा खळाळण्यासाठी उमेदवारांकडून अभिवचन घ्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

नाशिक - नाशिककरांसाठी मातेसमान असलेल्या गोदावरीला मैला वाहून नेणारी मालगाडी बनू देऊ नका. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दारात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून तसे अभिवचन जरूर घेण्याचे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी आज येथे केले. गोदामातेचे पावित्र्य टिकविण्यासाठी महापालिका निवडणूक ही चांगली संधी आहे, असे ते म्हणाले. 

श्री गोदावरी जन्मोत्सवानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात गोदावरी बचावासाठी तांत्रिक उपायांबाबत त्यांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले. या वेळी प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, त्र्यंबकेश्‍वर व निवृत्तिनाथ महाराज देवस्थानच्या विश्‍वस्त ललिता शिंदे, अभिनेता चिन्मय उदगीरकर आदी व्यासपीठावर होते. 

गोदावरी हे नाशिकचे वैभव असल्याचे स्पष्ट करत डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की मत मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराशी प्रत्येक नाशिककराने बोललेच पाहिजे. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रामाणिक राहील, असे त्यांच्याकडून अभिवचन घेतले, तरच नाशिकचे हे वैभव टिकेल. गोदेचे पावित्र्य राखण्यासाठी गोदावरीच्या प्रवाहाजवळ ठिकठिकाणी कुंड बनविले गेले; परंतु विकासाच्या नावाखाली गोदाघाट परिसरात कॉंक्रिटीकरण करत ते नष्ट केले गेले. प्रेम, आस्था नसल्यामुळेच आता गोदावरी कोरडीठाक पडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गोदावरीला तिचे पूर्वीचे सौंदर्य मिळण्यासाठी, ती प्रवाहित राहण्यासाठी तिचे कॉंक्रिटीकरण हटविण्यासाठी नाशिककरांनी प्रशासनावर दबाव वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

दीडशे वर्षांच्या वीस विहिरी 

नदीपात्रालगत 150 वर्षांहून अधिक काळाच्या जुन्या 20 विहिरी आहेत. या विहिरींना पाणी आहे. नदीपात्रातील कॉंक्रिटीकरणामुळे नैसर्गिक झरे बुजले आहेत. भूगर्भातील जलस्रोत जिवंत करण्यासाठी महापालिकेलाही निवेदन देण्यात आले. 

Web Title: Comment about Godavari river by politicians