येवला : लाखोंच्या अपहारप्रकरणी बच्चू कडूंच्या इशाऱ्याने सरपंचासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

A complaint was filed against the Sarpanch at yeola
A complaint was filed against the Sarpanch at yeola

येवला : ग्रामपंचायतीत विविध विकासकामांच्या तब्बल 41 लाखाच्या निधीचा अपहार प्रकरणी अखेर मंगळवारी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात सरपंचासह साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. ग्रामस्थांनी तब्बल चार ते पाच महिने सबळ पाठपुरावा केल्यानंतर मुरमी येथील ही ग्रामपंचायत आहे. गुन्हा दाखल करण्यास पोलीस चालढकल करत असल्याने आमदार बच्चू कडू यांनी देखील यात लक्ष घालून जाब विचारताच गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे असे प्रकार इतर ग्रामपंचायतीत झाले असल्याने निधी हडप करणाऱ्या पुढारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्रहारच्या कार्यकर्त्यांसह आमदारांकडून यात लक्ष घातल्यानंतर रात्री 11:30 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोमवारपासून येथील पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी तिसऱ्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. येथील ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोग व मनरेगाअंतर्गत शिवार रस्ते, शौचालय, वृक्ष लागवड, स्मशानभूमी दुरुस्ती, जलसंधारण योजनेतून गाळ काढणे, पाईप लाईन या कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर म्हणून सरपंच व उपसरपंच व रोजगार सेवक यांनी स्वत:च्या घरातील सदस्यांसह गावातील गोरगरीब लोकांच्या नावे बँकेत बनावट खाते उघडली. त्यांची नावे एटीएम प्राप्त करून त्याद्वारे निधी काढला असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी काही सबळ पुरावेही दिले होते. मात्र गेले चार महिने सखोल चौकशी होत नव्हती.

ग्रामस्थ सोमवारपासून उपोषणाला बसले, पण अधिकारी लक्ष घालत नसल्याने प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाउ महाजन व सहकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी पंचायत समितीत येऊन आक्रमक होत गटविकास अधिकरी कार्यालय ताब्यात घेतले. त्यानंतर गटविकासाधिकारी ए. ए. शेख यांनी संबधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी येवला तालुका पोलिसात पत्र दिले. पण पोलिस निरिक्षक हिरालाल पाटील यांनी वरिष्ठांच्या परवानगीचे निमित्त देत गुन्हा दाखल करण्यास सुरवातीला टाळाटाळ केली. पुन्हा येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार कडू यांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक पाटील यांना फोनवरुन हॅलो मी बच्चू बोलतोय, मुरमी अपहार प्रकरणाबाबत गुन्हा का दाखल होत नाही, असा जाब विचारताच पोलिस प्रशासनाने नमते घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु झाल्यानंतर पोलिस निरिक्षक पाटील यांनी उपोषणास बसलेल्या मुरमी ग्रामस्थांना लिंबु पाणी देउन रात्री 11:30 वाजता उपोषण सोडले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण, भूषण बच्छाव तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, ज्ञानेश्वर खोकले, पाटोदा शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ, कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, मंगेश आढाव, मुरमी ग्रामस्थ आनंदा पानसरे, साहेबराव शिंदे आदींसह सत्तर ग्रामस्थ उपस्थित होते.  

यांच्यावर झाले गुन्हे दाखल...
मुरमी येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अपहार प्रकरणात महात्मा गांधी रोजगार हमी योजना तांत्रिक अधिकारी पंकज नगराळे, अमोल भालेराव, सरपंच रघुनाथनाना शिंदे, निलंबित ग्रामसेवक नरेंद्र आहिरे, ग्रामसेविका मनिषा बनसोडे, रोजगार सेवक उत्तम जोंधळे व इतर निष्पन्न होणारे आरोपी यांनी ग्रामपंचायत कामात 41 लाख 13 हजार 763 रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याची लेखी तक्रार गटविकासअधिकारी अन्सार शेख यांनी येवला पोलिसात दिली. त्यावरुन तालुका पोलिसात गुन्हा रजिष्टर क्रमांक 118/2019 भा. द. वी. कलम 420, 467, 468, 471, 409, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मनरेगातील कामातील अपहार व गैरप्रकारचे मोठे लोन तालुक्यात पसरलेले आहे. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. आता त्या ठिकाणच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com