शिक्षक दिनानिमित्त जेष्ठ नागरीकांना संगणकाचे धडे

शिक्षक दिनानिमित्त जेष्ठ नागरीकांना संगणकाचे धडे

नाशिक- आज सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'साक्षर टीमच्या माध्यमातून राजीवनगर येथील लाइफ मिशन ज्येष्ठ नागरिक स्नेह संस्थेतील ज्येष्ठांना आज काल जीवनाचा अविभाज्य अंग झालेल्या मोबाईल वरील विविध इंटरनेट आणि सोशल साइट्सचा वापर कसा करावा याचे मोफत प्रशिक्षण दिले.

प्रा. प्रवीण पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी ही टीम तयार केली असून त्याद्वारे वर्षभरातील विशेष दिनी त्यांना असलेल्या सुट्टीचा या पद्धतीने उपयोग करून ते ज्येष्ठांना या सर्व विनामूल्य शिकवत आहेत. नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात आला.

टीमचे सदस्य अन्वी मालविया, रोहन दाणी, अनुराग मडेवार, प्रीती नाईक, जय राठोड, प्राजक्ता चंदनशिवे जीवन मालविया, प्रतिक्षा येवले, अभिषेक दीलपे, सानिया खान, मानसी नायर, झेबा शेख आणि पुष्कर देशपांडे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून लाईट बिल, फोन बिल कसे भरावे, पाणीपट्टी आणि घरपट्टी कशी भरावी, एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पैसे कसे वर्ग करावेत या सोबत फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, युट्युब या सोशल साईट बाबत माहिती देऊन त्यांचा वापर कसा करायचा हे शिकवले.

त्याचबरोबर, नेट बँकिंग वापरताना आपला पासवर्ड आणि ओटीपी क्रमांक याबाबत असलेल्या संवेदनशील बाबींची माहिती दिली. नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन तिकीट आरक्षित कसे करतात याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांनी या जेष्ठांना शुभेच्छा दिल्या. आज केवळ एकच सेशन न घेता आवश्यकता भासल्यास सुटीच्या दिवशी पुन्हा येऊन उजळणी वर्ग घेण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे . या पूर्ण टीमचे संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते आभार मानण्यात आले. यावेळी सुहास लेंभे, हेमंत गोखले ,सुधाकर गायधनी, कुणाल देशपांडे, पोपटराव निकुंभ, सुधीर कुलकर्णी, अशोक धर्माधिकारी, सुरेश कांबळे, शोभा जोशी, अरुणा कुलकर्णी आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com