यवतमाळमध्ये कॉंग्रेसची 71 मते फुटली

सुरेश भुसारी
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

हा विजय पैशाचा


यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशाचा विजय झाला आहे. मोठ्या प्रमाणावर पैशाच्या माध्यमातून मतदार खरेदी करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक मतदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केले नाही. याची चौकशी करण्यात येईल.
- वामनराव कासावार,
अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस समिती

नागपूर - यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून कॉंग्रेस पक्षाच्या तब्बल 71 मतदारांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे.
विधान परिषदेसाठी गेल्या शनिवारला मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांना विजय तर दूर आपल्याच पक्षातील मतदारांना एकत्र ठेवता आले नाही. यवतमाळमधून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप बाजोरिया निवडून आले होते. यावेळीही त्यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता. परंतु, कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने बाजोरिया यांनी वेळेवर उमेदवारी मागे घेऊन सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
या मतदारसंघात 443 मतदारांपैकी कॉंग्रेसकडे 149 मतदार होते. निवडून येण्यासाठी कॉंग्रेसला आणखी केवळ 70 मतांची गरज होती. कॉंग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांना केवळ 78 मते मिळाली. या अर्थ कॉंग्रेसची 71 मते बडे यांना मिळू शकली नाहीत. सेनेची या मतदारसंघात केवळ 71 मते होती. परंतु सेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांना 348 मते मिळाली म्हणजे 277 मते त्यांना इतर पक्षातून मिळाली. यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसची 89 व भाजपची 54 मते अशी 143 मते या दोन पक्षातून मिळाली.
तानाजी सावंत यांनी कॉंग्रेसच्या गडालाच खिंडार पाडले. कॉंग्रेसमधील 71 मतदारांना आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले. यामुळे कॉंग्रेसची प्रतिष्ठाच वेशीला टांगली गेली.

 

Web Title: Congress 71 votes to broken in Yavatmal