नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचा ‘थाळीनाद’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नाशिक - केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयांची नोटाबंदी करून दोन महिने उलटूनही सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज सकाळी काँग्रेस सेवादलाच्या शहर शाखेतर्फे काँग्रेस कमिटीसमोर घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

केंद्रातील मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला रात्री आठला चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली. या घटनेला दोन महिने उलटूनही नागरिकांना अद्यापही नोटाबंदीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय, यामुळे शेतीमालाचेही भाव कोसळल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर घंटा व थाळीनाद करण्यात आला. या वेळी प्रदेश काँग्रेसच्या महिलाध्यक्षा चारुशीला टोकस यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्षा वत्सला खैरे, वंदना मनचंदा, सुनीता बच्छाव, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते.

घोषणांनी परिसर दणाणला

नोटाबंदीमुळे ‘ना शेतमालाला भाव, ना लग्नाला पैसा... सरकारने सांगावे अब इंतजाम करे कैसा’, ‘बॅंकबुडव्या मल्ल्या इंग्लंडमध्ये चैनीत, निरपराध जनता मात्र बॅंकेच्या लायनीत’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘काळ्या पैशांतून शेतकरी कर्जमुक्ती करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ऐन गर्दीच्यावेळी थाळीनाद आंदोलन सुरू करीत सरकारचा निषेध केला. दरम्यान, पक्षाच्या घंटानाद व थाळीनादाने परिसर दुमदुमून गेला होता. वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यावर पोलिसांनी सेवादलासह पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Congress notabandi protest nashik