नवीन बांधकाम नियमावली विकासासाठी उत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

धुळे - राज्यातील ‘ड- वर्ग’ महापालिकांसाठी लागू केलेली नवीन बांधकाम नियमावली शहर विकासासाठी उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील नगररचनाकार अनंत धामणे यांनी केले. येथील महापालिकाही ‘ड’ वर्गात येते. 

धुळे - राज्यातील ‘ड- वर्ग’ महापालिकांसाठी लागू केलेली नवीन बांधकाम नियमावली शहर विकासासाठी उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील नगररचनाकार अनंत धामणे यांनी केले. येथील महापालिकाही ‘ड’ वर्गात येते. 

राज्य शासनाने ड- वर्ग महापालिकांसाठी नव्याने लागू केलेल्या बांधकाम नियमावलीची माहिती मिळावी व मार्गदर्शन व्हावे यासाठी ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’, क्रेडाई संस्था आणि महापालिकेतर्फे येथील शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात चर्चासत्र झाले. श्री. धामणे, माजी महापौर के. डी. मिस्तरी, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत केले, बिल्डर असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष सुनील मुंदडा, वास्तुविशारद रवी बेलपाठक, देवरे अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. नितीन खिंवसरा, प्रा. क्षीरसागर आदी उपस्थित होते.

परवानगीला प्रारंभ
श्री. धामणे म्हणाले, की तेरा वर्षांपासून महापालिका अस्तित्वात आली तरीही अ- वर्ग नगरपालिकांची बांधकाम नियमावली लागू होती. बिल्डर्स असोसिएशनच्या कित्येक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने राज्यातील १४ ड- वर्ग महापालिकांसाठी २९ सप्टेंबरला नव्याने बांधकाम नियमावली प्रसिद्ध केली. येथील महापालिकेने एक नोव्हेंबरपासून ही नियमावली लागू करून त्याप्रमाणे बांधकाम परवानगी देण्यास प्रारंभ केला.

‘मनपा’, बिल्डरना फायदा
नवीन बांधकाम नियमावलीमुळे गावठाण क्षेत्र सोडून ‘एफएसआय’ १.१० करण्यात आला आहे, तर ०.३ जास्तीचा ‘एफएसआय’ महापालिकेला प्रिमियम भरून मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेचेही उत्पन्न वाढेल. या व्यतिरिक्त बांधकाम व्यावसायिकाला ‘टीडीआर’ घेता येणार आहे. नवीन बांधकाम नियमावलीत रस्त्याच्या रुंदीप्रमाणे इमारतीची उंची ठरणार आहे. जेथे नऊ मीटर, त्यापेक्षा जास्त रस्त्यांची रुंदी आहे तेथे भविष्यात उंच इमारती अस्तित्वात येतील. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष संजय अहिरराव, सुभाष विसपुते, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देसले यांनीही मनोगत व्यक्त केले. बिल्डर्स असोसिएशन, क्रेडाई व संलग्न संस्थांचे सदस्य उपस्थित होते. प्रा. खिंवसरा यांनी सूत्रसंचालन केले. बिल्डर्स असोसिएशनचे सचिव शीतलकुमार नवले यांनी आभार मानले.

Web Title: Construction of the new rules for the development of capital