कामगारांचा मक्तेदाराविरुद्ध ‘एल्गार’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

जळगाव - जिल्हा दूध संघातील कामगारांनी मक्तेदाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसत गेटवर आज सकाळी दोन तास ठिय्या आंदोलन केले. 

जळगाव - जिल्हा दूध संघातील कामगारांनी मक्तेदाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसत गेटवर आज सकाळी दोन तास ठिय्या आंदोलन केले. 

जिल्हा दूध संघात अनेक वर्षांपासून कामगार भरती केली जात नाही. केवळ मक्तेदारामार्फतच काम केले जात आहे. त्यातही मक्तेदार मनमानी कारभार करीत आहेत. त्याच्या मर्जीप्रमाणे काहीही कारण नसताना कामगारांनी घरी पाठवले जाते. त्यांना रोजंदारीही मक्तेदाराच्या मर्जीप्रमाणेच दिली जाते, असा आरोप इंटकचे अध्यक्ष डी. के. पाटील यांनी केला आहे. जिल्हा दूध संघात गेल्या पंधरा वर्षांपासून चंद्रकांत अभिमान पाटील हे ‘ताक’ विभागात रोजंदारीवर काम करीत आहेत. ते कामगार युनियनचे पदाधिकारीही आहेत.

मात्र, कोणतेही कारण नसताना मक्तेदाराने त्यांना कामावरून कमी केले. तुम्ही कामगार संघटनेचे आहात, एवढेच एक कारण त्यांना कमी करताना दाखविले. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाच कमी केल्यामुळे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांतही भीती निर्माण झाली. आपल्यालाही केव्हाही कामावरून कमी केले जाईल, या भीतीने कामगारांनी मक्तेदाराविरुद्ध आंदोलन सुरू केले. आज सकाळी सहाला रोजंदारीवरील सर्व कामगारांनी ठिय्या आंदोलन करीत चंद्रकांत पाटील यांना कामावर घेण्याची मागणी केली. 

पशुखाद्य विभाग बंद 
युनियनचे अध्यक्ष डी. के. पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा दूध संघात कोणतीही कामगार भरती झालेली नाही. केवळ मक्तेदारांच्या भरवशावर काम सुरू आहे. जिल्हा दूध संघ डबघाईतून बाहेर येत असल्यामुळे हे सर्व सहन केले. परंतु, आता मात्र हा मक्तेदार अधिकच मनमानी करीत आहे. त्याने चक्क कामगारांना कमी करण्याचे धोरण सुरू केले आहे. विशेष म्हणजे जुन्या कामगारांनाही ते कामावरून कमी करीत आहेत. जिल्हा दूध संघाचे पदाधिकारी व संचालक तसेच व्यवस्थापनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मक्तेदाराचे ऑडिट करावे, अशी मागणीही आपण केली आहे. संघाचा पशुखाद्य विभागातही गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. तब्बल ३५ कर्मचारी घरी बसले आहेत. मोलॅसिस नसल्याचे कारण दाखविले जात आहे. परंतु, ही जबाबदारी कुणाची? व्यवस्थापनाने ते उपलब्ध करण्याकडे का दुर्लक्ष केले? जर पदाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला आहे.

Web Title: contractor oppose worker elgar