काँग्रेसच्या दणक्यानंतर २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन वॉर्डात ! 

काँग्रेसच्या दणक्यानंतर २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन वॉर्डात ! 

धुळे : येथील साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कारभारात काहीतरी घोळ होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी सोमवारी (ता. १२) केला. त्यांच्या पाहणीनंतर सिव्हिलच्या मेडिकल स्टोअरमधून लागलीच नोंदणी करून २०० रेमडेसिव्हिरचा साठा कोरोना वॉर्डला पाठविला. तसेच मेडिकल स्टोअरने सहा दिवसांत दोंडाईचा येथे ७०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिल्याचे समोर आले. 


सिव्हिलमधील या स्थितीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दुर्लक्ष करू नये, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. एकीकडे कोरोना वॉर्डातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय जोखीम पत्करून अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत असताना व्यवस्थापनाचा विसंगत कारभार दिसत असल्याचेही ते म्हणाले. 
 

घाईघाईने इंजेक्शन वॉर्डमध्ये 
जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा मोठा तुटवडा असल्याने असंख्य रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू आहे. पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत सिव्हिलकडे १७०० ते १८०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिकराव सांगळे यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर श्री. सनेर, श्री. करनकाळ यांनी सिव्हिलच्या मेडिकल स्टोअरला दुपारी भेट दिली. त्यावेळी २८३ इंजेक्शनचा साठा शिल्लक असल्याचे दिसले. याबाबत विचारणा करताच मेडिकल स्टोअरमधील कर्मचाऱ्याने नोंदणी करत घाईघाईने २०० इंजेक्शनचा साठा कोरोना वार्डमध्ये पाठविला. तसेच रजिस्टर तपासले असता दोंडाईचा येथे उपजिल्हा रूग्णालयात ५ ते १० एप्रिलपर्यंत ७०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाठविल्याची माहिती पुढे आली. 

सिव्हिलमधील कोरोना वॉर्डला श्री. सनेर, श्री. करनकाळ यांनी भेट दिली असता त्यांनी ५७ बेडची सुविधा असल्याने समाधान व्यक्त केले. रूग्णांची चांगल्याप्रकारे सेवा केली जात असल्याचे निदर्शनास आले. संवादानंतर सिव्हिलला चांगली सेवा मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. एकूण ५७ पैकी ४८ रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी वॉर्डला १०० इंजेक्शन मिळाले होते. पैकी सोमवारी ३७ शिल्लक होते. त्यात श्री. सनेर, श्री. करनकाळ यांनी मेडिकल स्टोअरला भेटीनंतर २०० इंजेक्शनच्या साठ्याची भर पडली आहे. पाहणी केली नसती तर या साठ्याचे काय झाले असते, अशी शंका उपस्थित करत या भेटीतून सिव्हिलला रूग्ण दाखल करा, मोफत चांगली सुविधा घ्या आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्या, असे आवाहन श्री. सनेर, श्री. करनकाळ यांनी केले. दरम्यान, सिव्हिलकडे सोमवारी सायंकाळी शिल्लक ८३ आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ४८० पैकी २०० इंजेक्शनचा पुरवठा झाल्याने सिव्हिलकडे एकूण २८३ इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे. 


सिव्हिलमधील 
रेमडेसिव्हिरची स्थिती 

९ एप्रिल............५३३ 
१० एप्रिल..........३३३ 
११ एप्रिल..........२८३ 
१२ एप्रिल...........८३ 
नवीन साठ्यामुळे...२८३ 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com