esakal | धुळ्यात नऊ जण विदेशातून परतले; आरोग्य यंत्रणेने क्वारंटाइन  
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात नऊ जण विदेशातून परतले; आरोग्य यंत्रणेने क्वारंटाइन  

धुळे शहरात दाखल झालेल्या नऊ जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सोपविली आहे. याआधारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह विविध खबरदारीच्या उपाययोजना राबवून विदेशातून आलेले ते नऊ नागरिक यंत्रणेच्या देखरेखीत आहेत.

धुळ्यात नऊ जण विदेशातून परतले; आरोग्य यंत्रणेने क्वारंटाइन  

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः लंडन (यूके)मध्ये काही दिवसांपूर्वी नवीन प्रकारातील कोरोना विषाणू आढळल्याने जगात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशात हवाई मार्गाने २३ नोव्हेंबरनंतर धुळे शहरात आलेल्या नऊ विदेशी नागरिकांना क्वारंटाइन केले असून, त्यांच्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेची देखरेख सुरू आहे. संबंधित नऊ जणांची प्रकृती उत्तम असून, चिंतेचे कारण नाही, असे यंत्रणेने सांगितले.

वाचा-ग्रामपंचायत निवडणूक ः बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता 

लंडनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळल्यावर जागतिक पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विमानसेवा प्राधिकरणाने २३ नोव्हेंबरनंतर धुळे शहरात दाखल झालेल्या नऊ जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सोपविली आहे. याआधारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह विविध खबरदारीच्या उपाययोजना राबवून विदेशातून आलेले ते नऊ नागरिक यंत्रणेच्या देखरेखीत आहेत.

वाचा-मूळ विचार-उच्चारासह अहिराणी टिकविण्याची गरज ! -
संबंधित पाच नागरिक मूळ धुळे शहरातील रहिवासी आहेत. सद्यःस्थितीत ते ब्रिटिश रहिवासी आहेत, तर एक महिला आयर्लंड येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. नऊ जणांमध्ये तीन महिला, दोन पुरुष, चार बालकांचा समावेश आहे. ते २३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत धुळे शहरात वास्तव्यास असल्याने त्यांची यादी विमान प्राधिकरणाने जिल्हा पातळीवर पाठविली. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने संबंधित नऊ जणांची तपासणी केली. त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे संक्रमणाचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन केले आहे, असे यंत्रणेने सांगितले.  
 

संपादन-भूषण श्रीखंडे

loading image