esakal | धुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्ण वाढले आणि चाचण्या घटल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

धुळे जिल्ह्यात १३६ वरून १६३ अशी झाल्याचे दिसते. दुसरीकडे याच कालावधीत लगतच्या नंदुरबार जिल्ह्यात मात्र सक्रिय रुग्ण घटले आहेत.

धुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्ण वाढले आणि चाचण्या घटल्या 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या महिनाभरात धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तुलनेने वाढली आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्येही धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वारंवार होत असलेल्या आवाहनानुसार जिल्हावासीयांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोविड १९ लसीकरणात धुळ्याची कामगिरी चांगली आहे. 

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सर्वच व्यवहार आता रुळावर येत असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन-प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करणे, उपाययोजना करणे, दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, कोरोनाचा धोका संपला या थाटात नागरिक बिनधास्त वागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तुलनात्मक स्थितीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचाही समावेश आहे. या अहवालानुसार ४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सक्रिय रुग्ण वाढलेल्या १५ जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १४५ (४ जानेवारी) वरून १६३ (१५ फेब्रुवारी) वर गेल्याचे नमूद केले आहे. तसेच ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या धुळे जिल्ह्यात १३६ वरून १६३ अशी झाल्याचे दिसते. दुसरीकडे याच कालावधीत लगतच्या नंदुरबार जिल्ह्यात मात्र सक्रिय रुग्ण घटले आहेत. या अहवालानुसार ८ ते १४ फेब्रुवारी या आठवडाभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण सर्वांत कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. 

सक्रिय रुग्ण (४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी) 
- धुळे जिल्हा ... १४५ ... १६३ (वाढले), 
- नंदुरबार जिल्हा ... ५६५ ... २८३ (घटले) 
९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी 
- धुळे जिल्हा ... १३६ ... १६३ (वाढले) 
- नंदुरबार जिल्हा ... ३८३ ...२८३ (घटले) 

सर्वांत कमी चाचण्या : 
प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे सर्वांत कमी चाचण्या (८ ते १४ फेब्रुवारी) : बुलढाणा- ५६८, धुळे- ५६८, नांदेड- ६७०, परभणी- ८५६, नंदुरबार- ८५६. 

लसीकरणात स्थिती चांगली 
कोविड १९ च्या लसीकरण मोहिमेत मात्र धुळे जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात तिसऱ्या, तर नंदुरबार जिल्हा १४ व्या क्रमांकावर आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण असे : धुळे जिल्हा- ११,४४१ (नोंदणी झालेले), ७,७६८ (लसीकरण झालेले), एकूण ६७.९० टक्के. नंदुरबार जिल्हा- १२,८४३ (नोंदणी झालेले), ७,१६८ (लसीकरण झालेले), एकूण ५५.८१ टक्के. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात मात्र थोडी पिछाडी दिसते. यात नंदुरबार जिल्हा दहाव्या (४४.१८ टक्के), तर धुळे जिल्हा ११ व्या (४४.०२ टक्के) स्थानी आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे