धुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची शंभर जणांवर रंगीत तालीम 

निखील सुर्यवंशी
Saturday, 9 January 2021

लसीकरण मोहिमेपूर्वी प्रात्यक्षिकातून, रंगीत तालीमेतून सरकारी यंत्रणेला सज्ज राहण्याची सूचना केंद्र व राज्य सरकारने दिली.

धुळे ः कोरोना लसीकरणासाठी `ड्राय रन` (रंगीत तालीम) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शंभर सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील) रंगीत तालीमेवेळी जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीत शुक्रवारी निवडक चार आरोग्य संस्थांमध्ये प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक झाले. 

आवश्य वाचा- पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा

 

संसर्गजन्य कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही कंपन्यांनी तयार केलेल्या लस स्वीकारल्या गेल्या आहेत. यानुसार लसीकरण मोहिमेपूर्वी प्रात्यक्षिकातून, रंगीत तालीमेतून सरकारी यंत्रणेला सज्ज राहण्याची सूचना केंद्र व राज्य सरकारने दिली. या पार्श्वभूमीवर धुळ्यासह राज्यात ३० जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणासाठी `ड्राय रन` मोहीम राबविण्यात आली. 

चार केंद्रात मोहिम

जिल्ह्यात सिव्हिल, नगाव आरोग्य केंद्र, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि महापालिका क्षेत्रातील प्रभात नगरमधील `एनयूएचएम`अंतर्गत दवाखान्यात ही मोहीम राबविली गेली. सिव्हीलमध्ये जिल्हाधिकारी यादव, सीईओ वान्मती सी., जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, लसीकरण विभागप्रमुख अनुपमा लोंढे, डॉ. अभय शिनकर, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. महेश भडागे, दीपाली गिरमकर, नरेश बोरसे, चंद्रकांत काटे, सुजाता परदेशी, कोमल कदम, राजश्री करजुरे, माधुरी नेमानेकर, प्रतिभा घोडके आदी उपस्थित होते. यात ‘ड्राय रन’ मोहीम यशस्वी करून प्रशासनाने लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दर्शविले. 

आवर्जून वाचा- रुग्णसेवेसाठी जळगावात धावणार ‘लाइफलाइन’ 
 

सर्व उपायोजना

जिल्हा शल्यचिकित्सक सांगळे म्हणाले, की जिल्हा आरोग्य यंत्रणेतील या लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी शंभर जणांची रंगीत तालीम मोहिमेसाठी निवड झाली. त्यांचा चेहरा आणि आधारकार्डवरील फोटो जुळल्यानंतर त्यांना लसीकरणासाठी प्रवेश दिला गेला. त्यांना एसएमएसव्दारे लसीकरणाची माहिती दिली गेली. तसेच दूरध्वनीवरून कळविले. त्यांची ऑक्सिजन पातळी तपासल्यानंतर टोकन दिले गेले. नंतर लसीकरणाचे प्रात्यक्षिक झाले. त्यांचे समुपदेशन केले गेले. लसीकरणावेळी मास्क बंधनकारक असून, लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांना बसविण्यात आले. यात लसीकरणाचे परिणाम तपासणीसाठी हा कालावधी आहे. 
 
जिल्ह्याचा समर्थपणे मुकाबला 
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की जिल्ह्याने दहा महिने कोरोनाशी समर्थपणे मुकाबला केला. सामूहिक प्रयत्नांमुळे कोरोनाला रोखण्यात चांगले यश आले. कोरोनाची लस देण्यापूर्वी रंगीत तालीम झाली. ती यशस्वी झाली. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणावेळी जनतेची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची साथ लागेल. 
 

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine marathi news dhule corona vaccine dry run successful

टॉपिकस