esakal | स्पेशल रिपोर्ट : "त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा!
sakal

बोलून बातमी शोधा

sakal exlusive corona

संबंधित "पॉझिटिव्ह' व्यक्ती विदेशानंतर 10 ते 15 मार्चपासून जळगाव, मुंबई, राजस्थान आणि दिल्लीपर्यंतचा प्रवास करून घरी परतली. या कालावधीत त्याच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्‍टरांसह त्याचे कुटुंबीय प्रारंभीच्या टप्प्यात "कोरोना' चाचणीच्या विळख्यात आहेत.

स्पेशल रिपोर्ट : "त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा!

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : जळगावला संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ची लागण झालेला 49 वर्षीय वाहनचालक व्यक्ती सापडला आणि यंत्रणेसह सरकारची झोप उडाली. आतापर्यंत या "व्हायरस'पासून "सेफ'च म्हटला जाणारा खानदेश या प्रकारानंतर गडद संकटाच्या छायेत आला. संबंधित "पॉझिटिव्ह' व्यक्ती विदेशानंतर 10 ते 15 मार्चपासून जळगाव, मुंबई, राजस्थान आणि दिल्लीपर्यंतचा प्रवास करून घरी परतली. या कालावधीत त्याच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्‍टरांसह त्याचे कुटुंबीय प्रारंभीच्या टप्प्यात "कोरोना' चाचणीच्या विळख्यात आहेत.

सौदे अरेबियात चालक
जळगाव येथील कोरोनोग्रस्त व्यक्ती सौदी अरेबियात वाहनचालक आहे. तेथून तो दुबईला परतला आणि मुंबईमार्गे रेल्वेने जळगावला पोहोचला. थोडे फार बरे वाटत नसल्याने, सर्दी- पडसे, खोकला असल्याने त्याने निवास भागासह दोन डॉक्‍टरांकडे तपासणी केली. मात्र, त्याने सौदी अरेबिया, दुबईहून परतल्याची माहिती दिली नाही. कोरोनाग्रस्त या व्यक्तीने साधारणतः 10 ते 15 मार्चदरम्यान रेल्वेने मुंबई गाठली. तसेच तो दिल्ली, राजस्थान, असा प्रवास करत पुन्हा मुंबईमार्गे रेल्वेने जळगावला परतला. त्याच्यासमवेत मालेगावच्या दोन व्यक्तीही होत्या, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो. जळगावला असताना श्‍वासोच्छावासाचा त्रास जाणवायला लागल्यावर त्याने जिल्हा रुग्णालय गाठले आणि तो कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल आला.

"त्याच्या' घरामध्ये 16 जण
या पार्श्‍वभूमीवर हादरलेल्या जळगावच्या सरकारी यंत्रणेने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा तपास सुरू केला आहे. प्रथम घरात आठ जण असल्याचे त्याने सांगितले. तपासणीत त्याच्या घरात 16, नंतर लपलेले दोन जण आढळले. त्यांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कोरोनाग्रस्त व्यक्तीची पूर्वी तपासणी करणारे स्थानिक दोन डॉक्‍टरही "टेन्शन'मध्ये असून त्यांचेही नमुने घेतले जातील. यंत्रणेने या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एकूण 24 जणांचे नमुने तपासणीला पाठविले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. उर्वरित माहिती "ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग'व्दारे संकलित करण्याचा प्रयत्न यंत्रणा करीत आहे.

"सेफ' खानदेशच संकटात...
"कोरोना'मुळे पंधरा दिवसांपासून खानदेशात अनेकांची घालमेल सुरू होती. या "व्हायरस'ने बाधित चीन, इटली, स्पेन, सौदी अरेबिया, दुबई, अमेरिका, रशिया, ब्राझील, मॉरिशस, नेपाळ यासह अनेक राष्ट्र, तसेच पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, गुजरातमधील सुरत, इंदूर, अहमदाबाद आदी ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नागरिक एकटे किंवा कुटुंबीयांसह कालपर्यंत या आजारापासून "सेफ' मानल्या जाणाऱ्या खानदेशातील मूळ गावी परतत होते. त्यात शनिवारी जळगाव येथे मेहरूण तलाव परिसरात 49 वर्षीय व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचा "पॉझिटिव्ह' अहवाल आल्याने यंत्रणा हादरली आणि "दक्षते'चे पितळही उघडे पडले.