क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर पावसामुळे पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

उपांत्य सामन्याचा महापालिकेत फीव्हर
नाशिक - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याचा फीव्हर महापालिकेत पाहायला मिळाला. दुपारी सामना सुरू झाल्यापासूनच मुख्यालयात शांतता पसरली होती. एरवी महापालिकेचे व्हरांडे कर्मचारी, नगरसेवक व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी गजबजलेले दिसतात. परंतु क्रिकेट सामना सुरू असताना सर्वत्र शांतता दिसत होती. महापालिकेत हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सामन्याचा मोह आवरला नाही. मोबाईलवर अनेक जण सामना बघण्यात गर्क होते. पदाधिकाऱ्यांच्या दालनात काही कर्मचारी सामन्याचा आनंद घेत होते.

मुख्यालयात थम पंचिंग असल्याने आउट पंचिंग करणे भाग होते. त्यामुळे सहालाच पंचिंग मशिनसमोर रांगा लागल्या होत्या. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीदेखील दुपारनंतर मुख्यालयाकडे पाठ फिरवली. महासभेचे कामकाज आटोपल्यानंतर अनेकांनी घरचा रस्ता धरला.

नाशिक - शहरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मॅंचेस्टर (इंग्लड) येथे झालेल्या पावसाने क्रिकेटचाहत्यांचा हिरमोड केला. न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीचा सामना पाहण्याचे नियोजन केलेले असताना, पावसाने मात्र आनंदावर पाणी फेरले. उर्वरित सामना उद्या होणार असल्याने आणखी एक दिवस उत्सुकता ताणली गेली आहे.  

दुपारपासून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला दांडी मारत, चाकरमान्यांनीही सुटी घेत सामन्याचा मनमुराद आनंद घेण्याचा बेत आखला होता. कुणी घरच्या टीव्हीवर, तर मोबाईल स्क्रीनद्वारे सामना पाहण्याची धडपड करत होते.

बाजारपेठातील दुकानांत लावलेल्या टीव्हीवरही सामना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. भारतीय संघाने जोरदार सुरवात केल्यानंतर मॅचवर भक्कम पकड केल्याने क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढला होता. त्यातच पावसाने लावलेल्या हजेरीमुळे सर्व उत्साहावर व आनंदावर पाणी फेरले गेले.

सोशल मीडियावर संदेशांचा महापूर
सोशल मीडियावरही सामन्यातील पडसाद उमटताना दिसले. फेसबुक, ट्‌विटरवर सामन्याशी निगडित अपडेट्‌स सुरूच होते. तर काही विनोदी, काही माहितीवर आधारित संदेशचा दिवसभर सोशल मीडियावर महापूर आल्याचे चित्र बघायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket Match Rain